गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी, नो दारू’

By admin | Published: July 26, 2014 12:44 AM2014-07-26T00:44:46+5:302014-07-26T00:45:57+5:30

कोल्हापूर शहरातील सर्व तालीम, तरुण मंडळांचा निर्धार

'No Dolby, no liquor' at Ganeshotsav | गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी, नो दारू’

गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी, नो दारू’

Next


कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव ‘नो डॉल्बी, नो दारू’ अशा पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार शहरातील तालीम, तरुण मंडळे, राजकीय, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘यंदाही डॉल्बीला विघ्न?’, असे ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्धार करत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ताबडतोब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार शहरात आज, शुक्रवारी अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक राणे यांनी जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या. बैठकीच्या सुरुवातीस कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव ‘नो डॉल्बी, नो दारू’मुक्त साजरा केला जाईल. मिरवणूक पारंपरिक, विधायक, ऐतिहासिक पद्धतीने काढली जाईल, असा निर्धार एकमुखाने केला.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सव सलग दोन वर्षे साजरा झाल्याने त्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. ही परंपरा अशीच कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णयही मंडळांनी यावेळी घेतला. मूर्ती दान करणे, निर्माल्याकरिता सोयी उपलब्ध करणे, रस्त्यांची दुर्दशा, रेंगाळणाऱ्या मिरवणुका, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीमध्ये मिरवणुकीची सुरुवात राजारामपुरीतील आईसाहेब महाराज पुतळ्यापासून सुरू करावी, अशी मागणी केली. दरम्यान, घरगुती गणेश विसर्जन करताना जेवढे पावित्र्य जपले जाते तेवढेच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने राखावे. मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावणाऱ्या तसेच मद्यप्राशन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोयल यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'No Dolby, no liquor' at Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.