Kolhapur: ‘यंदा चुकीला माफी नाही’; मंत्री मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस, मंडलिक यांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:52 IST2025-01-25T16:52:02+5:302025-01-25T16:52:24+5:30

विधानसभेतील चुकीला उत्तर देण्याची तयारी..

No excuse for wrongdoing this year, Minister Hasan Mushrif Activists gave this warning to Sanjay Mandalik group | Kolhapur: ‘यंदा चुकीला माफी नाही’; मंत्री मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस, मंडलिक यांना सूचक इशारा

Kolhapur: ‘यंदा चुकीला माफी नाही’; मंत्री मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचे स्टेटस, मंडलिक यांना सूचक इशारा

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या स्टेटसची सध्या कागलसह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘यंदा चुकीला माफी नाही’, या स्टेटसचे अर्थ वेगवेगळे काढले जात असले, तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील राजकारणाचा राग यातून व्यक्त केला जात आहे. त्यातूनच माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाला हा सूचक इशारा असल्याचे म्हटले जात आहे.

कागलमधील सत्तासंघर्ष जिल्ह्याला नवा नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील टाेकाचा संघर्ष येथील जनतेने अनुभवला. अलीकडे मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष व्यक्तिगत पातळीवर पाेहोचला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची निवडणूक झाली. यामध्ये कागलमधील संजय घाटगे वगळता सगळे नेते एकत्र असताना संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नसल्याची सल मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत होती. त्याचे थेट पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले. 

निवडणुकीच्या आधीच विरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढवला होता. नंतरच्या काळात मंडलिक गट शांत होऊन मुश्रीफ यांच्या प्रचारात सक्रिय दिसला, पण अपेक्षित मदत झाली नसल्याची तक्रार मुश्रीफ गटाची आहे. तेव्हापासून एकमेकांचे उट्टे कोठे काढता येईल, याची संधी दोन्ही गट शोधत आहेत. स्टेटसच्या माध्यमातून आव्हान-प्रतिआव्हान देण्याचे प्रकार वाढले असून, गेले दोन दिवस ‘यंदा चुकीला माफी नाही’, हा स्टेटस मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांचा दिसत आहे.

घाटगे यांना सोबत..

मंडलिक व मुश्रीफ यांच्यातील वाद कमी करण्याची भूमिका २०१५ ला मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून घेतली. संजय मंडलिक यांना सोबत घेऊन त्यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना झटका दिला होता. आता घाटगे यांना सोबत घेत मंडलिक यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

‘हमीदवाडा’ कारखान्यात कोंडी शक्य

हमीदवाडा साखर कारखान्याच्या २००७ व २०१२ च्या निवडणुकीत मंडलिक व मुश्रीफ गटातील संघर्ष उफाळला होता. त्यानंतर २०१७ व कोरोनामुळे लांबलेली जून २०२३ची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, मुश्रीफ गटांतर्गत हालचाली पाहता, ‘हमीदवाडा’ कारखान्याच्या निवडणुकीत मंडलिक गटाची कोंडी करण्याची संधी ते सोडतील, असे वाटत नाही.

समरजीत यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले समरजीत घाटगे हे पुन्हा स्वगृही परतणार, अशी चर्चा होती. पण, ते गेले दोन दिवस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत कोल्हापुरात राहिल्याने सध्या तरी त्यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका राहणार, हे निश्चित आहे.

Web Title: No excuse for wrongdoing this year, Minister Hasan Mushrif Activists gave this warning to Sanjay Mandalik group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.