राजकारणासाठी चारची वॉर्ड रचना नकोच, सतेज पाटील यांची विधानपरिषदेत सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:21 PM2024-03-05T12:21:09+5:302024-03-05T12:21:58+5:30
चार विधानसभा एकत्र करू या का..
कोल्हापूर : महापालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या तीन वरून चार करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - २०२४ हे प्रशासकीयदृष्ट्या अव्यवहार्य आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसून नगरपालिका - महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विधेयक घाई-गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, केवळ राजकारणासाठी चारची वाॅर्ड रचना नको, अशी सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेत सोमवारी महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - २०२४ मांडण्यात आले. चर्चेत भाग घेताना आमदार पाटील म्हणाले, महापालिका, नगरपालिकांबाबत राजकीयदृष्ट्या आम्ही किती वर्ष खेळ करणार आहोत हा निर्णय आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंतच्या व्यवस्थेत एक वॉर्ड निर्णयाप्रमाणे कारभार यशस्वीरीत्या चाललेला आहे.
राज्यात एक लाख १५ हजार कोटी रुपयांचे बजेट प्रशासकांच्या ताब्यात आहे. १४, १५ वा वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा याच्यावर निर्णय होत नाही. खेळखंडोबा सुरू असून याचा लोकांना त्रास होणार आहे. एक नगरसेवक असेल तर त्याच्यावर दायित्व असते. चार नगरसेवक झाल्यास त्या वॉर्डमधील माणसाने नेमके कोणाकडे जायचे ? कामासाठी कोणाला जबाबदार धरायचे ? अधिकाऱ्यांना कामासाठी कोणत्या नगरसेवकाने संपर्क करायचा? जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे असे प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे.
चार विधानसभा एकत्र करू या का..
केवळ राजकारणासाठी वॉर्ड रचना बदलत राहिलो तर आपली नोंद इतिहासात या नगरपालिका महापालिकेचे नुकसान करणारे आमदार म्हणून होईल हे लक्षात ठेवा. आपण चार विधानसभा मतदारसंघ एकत्र करून निवडणूक लढवू शकतो का ? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.