निधीच नाही, बालसंगोपन कसे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:27+5:302021-06-06T04:17:27+5:30

कोल्हापूर : अनाथ निराधार, एकच पालक किंवा दुर्धर आजारग्रस्त किंवा कैदी असलेल्या पालकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेतील गेल्या ...

No funds, how to take care of children | निधीच नाही, बालसंगोपन कसे करणार

निधीच नाही, बालसंगोपन कसे करणार

Next

कोल्हापूर : अनाथ निराधार, एकच पालक किंवा दुर्धर आजारग्रस्त किंवा कैदी असलेल्या पालकांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेतील गेल्या सहा महिन्यांचे अनुदान बालकांना मिळालेले नाही. आधीच्याच लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नसताना या योजनेत आता कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पालकांचे निधन झालेल्या बालकांसाठीच ही तरतूद असल्याने एक पालक आणि ती आई असेल तर मुलांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न यात अनुत्तरीतच आहे.

कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांसाठी राज्य शासनाने बालसंगोपन योजनेतून ५ लाख रुपये ठेव ठेवण्याचा व त्यांच्या संगोपनाचा खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेतील या पूर्वीच्याच लाभार्थ्यांना वेळेत अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मुलांची वाताहत होवू नये म्हणून शासनाने बालसंगोपन योजना सुरू केली होती. त्याची व्याप्ती वाढवत यात अनाथ, निराधार बालके, एकच पालक असलेली बालके, किंवा पालक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशा कुटुंबातील लहान मुलांचाही या योजनेत समावेश करण्यात आला. या योजनेतील लाभार्थी बालकांनाच सहा सहा महिने अनुदानाची रक्कम मिळत नाही, त्यात आता कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या बालकांचा समावेश केला आहे.

---

योजनेतील लाभार्थी बालके

२०२०-२१ : १२२ अर्ज : ३ लाख २० हजार अनुदान मंजूर

२०२१-२२ : १४० अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित

---

योजनेतील त्रुटी

-उत्पन्नाचा नियमच नाही : उत्पन्नाचा निकष नसल्याने अत्यंत सधन कुटुंबातील बालकांसाठीदेखील योजनेत प्रस्ताव आले आहेत. खऱ्या गरजू बालकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवायचा असेल तर उत्पन्नाची मर्यादा घालून देणे गरजेचे आहे.

-लाभ वेळेवर न मिळणे : या योजनेचे अनुदान सहा-सहा महिने मिळत नाही, शासनाकडून निधी येईल त्याप्रमाणे वाटप होते.

--

कोणाला मिळणार लाभ?

एखाद्या बालकाच्या एका पालकाचे निधन अन्य कोणत्याही आजाराने झाले असेल व आता कोरोनाने दुसऱ्याही पालकाचे निधन झाले असेल, किंवा दोन्ही पालकांचे कोरोनाने निधन झाले असेल अशा बालकांना या योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.

---

आईने काय करायचे?

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार एका पालकाचा मृत्यू झालेल्या मुलांची संख्या १७५ इतकी असून त्यापैकी १४३ मुलांच्या वडिलांचे निधन झाले आहे. यात दोन महिन्यांच्या बालकापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. कुटूंबाची जबाबदारी एकट्या महिलेवर आली आहे, अशा कुटुंबांचा या योजनेत विचार झालेला नाही.

---

कोरोनामुळे बालसंगोपनचा सहा महिन्यांचा निधी आलेला नव्हता आता तो मिळाला असून तो खात्यावर वर्ग करणे बाकी आहे. या वर्षाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

आशिष पुंडपळ ( विधी सल्लागार)

---

Web Title: No funds, how to take care of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.