‘सं. गीता गाती ज्ञानेश्वर’ने केला अपेक्षाभंग --राज्य नाट्य स्पर्धा
By Admin | Published: January 30, 2015 09:32 PM2015-01-30T21:32:41+5:302015-01-30T23:16:06+5:30
पार्श्वगायन विस्मयकारी : नांदीनंतर नाटक रंगलेच नाही...
महाराष्ट्र शासन आयोजित ५४व्या मराठी संगीत नाट्य स्पर्धेत सं. गीता गाती ज्ञानेश्वर हे अकरावे नाटक सादर झाले. काही अपरिहार्य कारणामुळे कल्याणच्या ‘अश्वमेध’ या संस्थेने हे नाटक २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सादर केले.
या नाटकामध्ये मुक्ताईच्या भूमिकेसाठी पार्श्वगायिका वापरण्यात आली. हे या नाटकाचे अपेक्षित नसलेले वेगळेपण. नाटकाची सुरुवात ‘विश्वनाट्य सूत्रधार’ या नांदीने झाली. अनघा देशपांडे (मुक्ताई) या गायक कलाकार नसतानाही त्यांना केवळ अभिनयाच्या जोरावर मुक्ताईची भूमिका देण्यात आली. त्यामुळे गवळण म्हणून सादर झालेले ‘काय सांगू, तू ते,’ हे पहिलेच पद पूर्णपणे स्वराबाहेर गायले गेले. त्यांना आदिनाथ पातकर (आॅर्गनवादक) यांनी पहिली ओळ पूर्णपणे वाजवून दाखविली, तरीही त्यांना शेवटपर्यंत सूर सापडला नाही. त्यांच्याबरोबर त्यावेळी रंगमंचावर मंदार खटावकर (सोपानदेव) होते. त्यांनी स्वत: पद म्हणून अनघा देशपांडे यांना सुरावर आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण, सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. मुक्ताईच्या तोंडी नाटकामध्ये ३ ते ४ महत्त्वाची पदे असताना दिग्दर्शकाने गायिका अभिनेत्रीची निवड करायला हवी होती.
पार्श्वगायिका वापरण्याची परंपरा, प्रथा, संगीत नाटकात नाही. त्यामुळे हे नाटक स्पर्धेच्या नियमात बसत नसल्याचे काही जाणकार रसिकांनी सांगितले. नाटकासाठी पार्श्वसंगीत खूप लाऊड स्वरुपात वापरले. काही कलाकारांचे शब्द अडखळले.
या नाटकामध्ये संदीप राऊत (वासुदेव) यांनी दर्जेदार वासुदेव रंगविला. चिपळ्या, टाळ, डोक्यावरील फिरणारी टोपी, पायात चाळ हे सर्व सांभाळून त्यांनी जी पदे गायली ती थक्क करणारी होती. नाचताना होणारा पदन्यास लाजवाब होता. सुनील जोशी (विसोबा) यांचाही अभिनय दर्जेदार होता. सर्वच कलाकारांनी भूमिकेला अनुसरून आणलेले चेहऱ्यावरचे भाव वाखाणण्याजोगे होते. अभय करंदीकर (ज्ञानेश्वर) यांनी अभिनयाबरोबर पदांनाही चांगला न्याय दिला. अनघा देशपांडे (मुक्ताई) यांनी गायन सोडून अभिनयात मात्र चांगले कौशल्य दाखविले. ‘ट्रीकसिन्स’ हे या नाटकाचे वैशिष्ट्य होते. मोगऱ्याचे क्षणार्धात बहरलेले झाड, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे, वासुदेवाची फिरणारी टोपी, समाधीमधून ज्ञानेश्वरांनी दिलेले दर्शन, ज्ञानेश्वरांच्या गळ्यात पडलेले हार, आशीर्वाद देणारे विठ्ठल-रखुमाई, रेड्यामुखी वदवलेले वेद यामुळे नाटकाने एक वेगळी उंची गाठली. आदिनाथ पातकर (आॅर्गन) यांनी उत्तम आॅर्गनसाथ केली. निखिल अवसरीकर (तबला) यांनीही समर्पक तबलासाथ केली. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना सारे उत्तम होते. नाटकात प्रथमेश तारळकर या रत्नागिरीच्या पखवाज वादक कलाकाराने आयत्यावेळी समर्पक पखवाज साथ केली. दिग्दर्शक सुनील जोशी यांनी समर्थ दिग्दर्शन केले. पार्श्वगायनाचा वापर झाल्यामुळे या नाटकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्पर्धेत उतरताना दिग्दर्शक व सादरकर्ते यांनी याचे भान ठेवावे.
संध्या सुर्वे