मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:28 AM2017-09-25T00:28:32+5:302017-09-25T00:28:32+5:30

No last year's business relationship | मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

मागील वर्षीच्या कारभाराशी संबंध नाही

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
राशिवडे : ‘भोगावती’मध्ये पुढीलवर्षी एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. मागील वर्षीच्या कारभाराशी चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या काळातील एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्यासाठी पुन्हा कर्ज काढले, तर भोगावती पुन्हा आर्थिक डबघाईला जाईल, अशी भीती ‘भोगावती’चे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील यांनी ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.
आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले, कारखान्यावर २११ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज आहे. आमचा कारभार पारदर्शक व काटकसरीने चालू आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत आम्ही ५५ ते ६० टक्के कमी दराने खरेदी केली आहे. सध्या आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कारखान्यावर एक रुपयांचा खर्च न टाकता सहवीज प्रकल्प ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर उभारणार आहोत. यावर्षी ऊस विकासाला चालना देणारा असून संचालक मंडळाचे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सभासद व परिसरातील सर्व शेतकºयांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस भोगावतीस पाठवावा तरच आम्हाला जास्तीत जास्त ऊस दर देणे शक्य होईल, असे स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांनी गत हंगामातील उसाला इतर कारखान्यांच्या तुलनेत आणखी ३०० रुपये जादा दर देण्याची मागणी केली. तीच मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, आण्णाप्पा चौगले, टी आर पाटील, बाबूराव कोथळकर यांनी लावून धरली. त्यांचा हाच धागा पकडून कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनीही ३०० रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चारर केला. प्रशासकांच्या १३ महिन्यांच्या काळातील निर्णयांना जबाबदार कोण? असा जाब त्यांनी विचारला. त्यावर बोलताना माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांनी कारखान्यावर कर्ज नव्हते म्हणणाºयांनी श्वेतपत्रिका काढावी कर्जाचा आकडा २५० कोटींच्या खाली आला तर जाहीर माफी मागतो, असे जाहीर आव्हान माजी चेअरमन यांना दिले. त्यानंतर विद्यमान चेअरमन यांनीच श्वेतपत्रिका काढण्याची सूचना माजी चेअरमन यांनी मांडली. त्याबाबत बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी त्या कारभाराला प्रशासकाबरोबरच माजी चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले.
विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक अनंत निकम व मागील सभेचा इतिवृतांत वाचन कार्यालयीन प्रमुख बळीराम पाटील यांनी केले. सभेतील चर्चेत माजी उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, संतोष पोर्लेकर, सुरेश कुसाळे, निवास डकरे, भिवाजी पाटील, लहुजी कुसाळे, एकनाथ भोसले, बी. जी. खांडेकर, सदाशिव खडके आदींनी सहभाग घेतला. सभेला उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, सर्व आजी माजी संचालक मंडळ, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे व उदय पाटील सडोलीकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सडोलीकर, कारखान्याचे माजी चेअरमन संभाजीराव पाटील-सडोलीकर, माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, हंबिरराव पाटील, एम. आर. पाटील, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, राधानगरीचे उपसभापती रविश पाटील- कौलवकर, करवीरचे उपसभापती विजय भोसले, आदी उपस्थित होते.
मिशी आणि खरकटे !
‘भोगावती’च्या वाताहतीला विस्तारवाढीपासून सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कारभाºयांनी कारखान्यातील भ्रष्टाचाराचे खरकटे मिशीला लागले नसल्याचे जाहीर करावे, असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील दिले. त्यावर बोलताना आजपर्यंतच्या काळात माझ्या मिशीला खरकटे लागू दिले नसून, पाच वर्षांच्या काळात ही खरकटे लागू देणार नसल्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले.

Web Title: No last year's business relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.