लॉकडाऊन नाही पण सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:54+5:302021-03-23T04:24:54+5:30

मंत्री पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली ‘नो मास्क ...

No lockdown but be careful | लॉकडाऊन नाही पण सतर्क रहा

लॉकडाऊन नाही पण सतर्क रहा

Next

मंत्री पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. मागील अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीवर भर द्यावा लागेल. सर्वजण यंत्रणा सज्ज ठेवू आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोविडपासून मुक्त ठेवू.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. प्रशासनास मदत करावी, असे आवाहन केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, एलपीजी असोसिएशन, रिलायन्स मॉल, स्टार बझार, मार्केट यार्ड आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

--

आधुनिक श्रावणबाळ व्हा : संजयसिंह चव्हाण

४५ वर्षावरील बाधित तसेच ६० वर्षावरील ज्येष्ठांचे लसीकरण ३१ मार्चपूर्वी पूर्ण करून तरुणांनी आधुनिक श्रावणबाळ व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. खानावळी आणि हॉटेलमध्ये बैठक रचनेत बदल करावा. समोरासमोर बसण्याऐवजी भिंतीकडेला तोंड करून जेवण्यासाठी बसवावे. खासगी रुग्णालयात ‘मी लस घेतली आहे, लस सुरक्षित आहे, ती आपणही घ्यावी’ असे फलक डॉक्टरांनी लावावेत असेही ते म्हणाले.

----

मार्गदर्शक सूचना अशा

-‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हा फलक लावून त्याची अंमलबजावणी हवी.

- प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार वाहतूक हवी.

- ५० टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत,

- स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, पॉस मशीनसाठी सॅनिटायझर वापरा.

- लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी गेलं पाहिजे.

- खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे.

- मास्कशिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी.

- शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा.

- मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दक्ष राहून नियमांचे काटेकोर पालन करावे.

--

लसीचे ९६ हजार डाेस

मंत्री पाटील म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आतादेखील लसीचे ९६ हजार डोस उपलब्ध झाले आहेत, तरी नागरिकांनी लस घेऊन सहकार्य करावे.

---

फोटो नं २२०३२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.

---

Web Title: No lockdown but be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.