लॉकडाऊन नाही; पण नियम पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:25+5:302021-02-23T04:39:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने लॉकडाऊन, जमावबंदी, रात्रीची संचारबंदी असे नियम लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने लॉकडाऊन, जमावबंदी, रात्रीची संचारबंदी असे नियम लागू केलेले नाहीत. हे वातावरण असेच राहण्यासाठी आता व्यावसायिक, दुकानदारांनी मास्क नसेल तर सेवा व वस्तू मिळणार नाही हे धोरण अवलंबावे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे; अन्यथा दंडात्मक कारवाई व प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिला.
राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील संसर्ग, आरोग्य यंत्रणांची तयारी यांचा आढावा सोमवारी बैठकीत घेण्यात आला. यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना रुग्णसंख्येबाबत कोल्हापूरची स्थिती सध्या समाधानकारक असली तरी वाढती रुग्णसंख्या बघता कोरोनाची दुसरी लाट थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुन्हा मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व शारीरिक अंतर या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. समारंभ, कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध आणले आहेत. स्थानिक पातळीवर व्यावसायिकांनी व आस्थापनांनी नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, त्याशिवाय वस्तू व सेवा देऊ नयेत. ज्या आस्थापना हे नियम पाळणार नाहीत, त्यांना आधी समज दिली जाईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातील व त्यांचा व्यवसाय परवाना रद्द केला जाईल. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे.
---