गरिबांसाठी पॅकेज जाहीर झाल्याशिवाय लॉकडाऊन नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:39+5:302021-04-11T04:24:39+5:30
कोल्हापूर : मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन जाहीर करण्याच्या मानसिकतेत ...
कोल्हापूर : मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन जाहीर करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे; परंतु गरिबांना मदतीचे पॅकेज जाहीर केल्याशिवाय लॉकडाऊन जाहीर नको, अशी आमची भूमिका असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्यानंतर पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणताना नागरिकांचा जीव जाणार नाही हे देखील पहावे लागेल. १४ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लावा म्हणायला डॉ. तात्याराव लहाने यांचे काय जातेय. त्यांनी झोपडपट्टीत जाऊन जरा परिस्थिती पहावी. सर्वसामान्यांना शासन घरी शिवभोजन थाळी पाठविणार आहे का. एकीकडे पैसे नाही म्हणतात, तर मग आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपये का दिले. ते दिले नसते तर ७०० कोटी रुपये उपलब्ध झाले असते. मुंबईमधील नगरसेवकांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. मुलाची हौस पुरी करायला पैसे आहेत, मग गरिबांच्या पॅकेजसाठी पैसे नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. लवकरच तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.