यापुढे निवडणूक लढवणार नाही
By admin | Published: April 15, 2017 01:10 AM2017-04-15T01:10:37+5:302017-04-15T01:10:37+5:30
चंद्रकांतदादा पाटील : नेसरीत महासंपर्क अभियान कार्यक्रम उत्साहात
नेसरी : पक्षाकडून मी कधी आमदारकी मागितली नाही, कधी मंत्रिपद मागितले नाही. राज्यात नंबर २ चा नेता म्हणून पक्षाने विश्वास टाकला. मी तर सगळ्यात सुखी माणूस असेन, जेव्हा मोदीजी सांगतील की, बास, आपकी बहुत सेवा हुई, अब आपके घर मे आराम करो, तर मी ईश्वराची साधना आनंदात करण्यात वेळ घालवेन, असे प्रतिपादन करत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करा, असा सवाल देत मी येथून पुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली.
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळा, भाजप कार्यकर्ता मेळावा व नूतन जि. प. व पं. स. सदस्यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे विभागीय संघटक रवी अनासपुरे होते. डॉ. प्रकाश शहापूरकर, मारुती राक्षे, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.येत्या वर्षभरात जिल्ह्यातील रखडलेले नऊ पाणी प्रकल्प मार्गी लावणार असून उचंगी, आंबेओहळ प्रकल्पात पुढच्या वर्षी पाणीसाठा होईल व जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मे महिन्यात धनादेश देण्यात येणार असल्याची माहितीही दिली. आधीच्या सरकारने १५ वर्षांत २४ प्रकारच्या योजनांवर खर्च केला नाही, असा टोलाही यावेळी विरोधकांवर मारला.रवी अनासपुरे यांनी विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा.
बाबा देसाई म्हणाले, सगळीकडे आता कमळ फुलले आहे. भाजपचा विचार सर्वांना पटल्यामुळे आता विजय दूर नाही. तेव्हा २०१९ ला जिल्ह्यातील १० पैकी १० आमदार हे भाजपचेच असतील.
जि. प. सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. यावेळी पं. स. सभापती जयश्री तेली, जगन्नाथ हुलजी, नूतन जि. प. सदस्य राणी खमलेट्टी, सुनीता रेडेकर, अनिता चौगुले, कल्लाप्पा भोगण, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राजेंद्र तारळे, महादेव साखरे, एन. डी. पाटील, नामदेव पाटील, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील, प्राचार्य डॉ. के. आर. पाटील, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, प्राचार्य आर. बी. पाटील,यांच्यासह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात
केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना आहेत. त्या फक्त कागदावर राहता कामा नयेत, तर त्याचा उपयोग गरजू व सर्वसामान्यांपर्यंत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.