मास्क नाही तर वस्तुही नाही फलक नावालाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:32+5:302021-03-07T04:21:32+5:30
जयसिंगपूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने मास्क नाही, प्रवेश नाही या मोहिमेची सुरुवात केली होती. मास्क न घातल्यास वस्तू ...
जयसिंगपूर : सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने मास्क नाही, प्रवेश नाही या मोहिमेची सुरुवात केली होती. मास्क न घातल्यास वस्तू मिळणार नाही, असा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्यातरी नागरिकांकडून नियमावलींचे पालन होतच नसल्याचे दिसून येत आहे.
शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, नांदणी, उदगाव येथे नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे आदेश जुगारत बाजारपेठेत नागरिकांची भाजी खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. यामध्ये संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही. नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे.
सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील नागरिक विनामास्क फिरत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांनीही कारवाईची वाट न पाहता शिस्त पाळणे तेवढेच गरजेचे आहे. मागील वर्षी कोरोनाने हाहाकार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था कोलमडली होती. ही वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी. कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असतानाही आजही अनेक सामाजिक, राजकीय कार्यक्रमासह लग्न समारंभांमध्ये गर्दी होत असतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने मास्क लावूनच विक्री करावी. ग्राहकांनी देखील त्याचे पालन करावे. तरच शासनाच्या उपक्रमाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार आहे.