बेपत्ता मुलांचा शोध नाही, आई-वडील चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:58 AM2019-02-25T10:58:54+5:302019-02-25T11:00:10+5:30
बारावी परीक्षेचा नंबर कोणत्या महाविद्यालयात आहे, ते पाहून येतो, असे सांगून निघून गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहा दिवस उजाडले, तरी ठावठिकाणा लागलेला नाही.
कोल्हापूर : बारावी परीक्षेचा नंबर कोणत्या महाविद्यालयात आहे, ते पाहून येतो, असे सांगून निघून गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहा दिवस उजाडले, तरी ठावठिकाणा लागलेला नाही.
राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या फोटोसह माहिती पाठविण्यात आली आहे. पोलिसांसह नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. मुलांच्या ओढीने आई-वडील हतबल झाले आहेत. ते सापडले नसल्याने चिंतेत आहेत. नातेवाईक त्यांना सावरत आहेत.
सौरभ सुहास घोदे (वय १८, रा. शिंदे कॉलनी, नागदेववाडी, रिंगरोड, कोल्हापूर) व पुष्पेंद्रसिंह झबरसिंह राजपूत (१८, रा. उत्तरेश्वर प्लाझा, उत्तरेश्वर पेठ) हे दोघे मित्र असून, ते १९ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाले आहेत. करवीर पोलिसांसह पालक आणि नातेवाईक या दोघांचा कसून शोध घेत आहेत. त्यांचे मोबाईल बंद असल्याने सायबरकडून त्यांचे लोकेशन मिळत नाही.
सौरभकडे टॅब आहे. सायबर सेलकडून त्याचे लोकेशन मिळते काय, याची चौकशी आज, सोमवारी केली जाणार आहे. मुलांचा शोध लागला काय साहेब, म्हणून गेले सहा दिवस आई-वडील करवीर पोलीस ठाण्याचे हुंबरे झिझवीत आहेत. याप्रकरणी अधिक तपास हवालदार संजय कोळी करीत आहेत.