भरपूर प्रयोग केले आता, आपलेच शेत नांगरणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 06:15 PM2023-07-03T18:15:51+5:302023-07-03T18:16:49+5:30

नव्या पर्यायाचा विचार तूर्तास नाही

No more experimenting with a new front says Raju Shetty | भरपूर प्रयोग केले आता, आपलेच शेत नांगरणार - राजू शेट्टी

भरपूर प्रयोग केले आता, आपलेच शेत नांगरणार - राजू शेट्टी

googlenewsNext

राम मगदूम

गडहिंग्लज : देशपातळीवर भाजप आणि राज्यपातळीवर 'महाविकास'सोबत आघाडीचा प्रयोग करून पाहिला. परंतु, दोघेही एकाच माळेचे मणी निघाले. जनतेच्या भल्यासाठी नवे प्रयोग करण्याच्या नादात आपलेच शेत नांगरायचे राहून गेले. त्यामुळे आधी आपले शेत  नांगरतो, चांगली मशागत करतो. तरच पीक चांगले येईल.त्यामुळे सद्य:स्थितीत राज्याला नवा पर्याय देण्याचा विचार तूर्तास डोक्यात नाही, अशी प्रतिक्रिया  माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर ते गडहिंग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात छेडले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. चळवळीची पार्श्वभूमी असलेले शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष आणि अन्य छोट्या- मोठ्या संघटनांनी एकत्र येणे ही आमची नैसर्गिक युती आहे.आमचे'कार्यक्षेत्र' व 'पॉकेट'ही वेगळे आहे,आम्ही वेळोवेळी एकमेकांना मदतही करीत असतो. परंतु,नव्या पर्यायाचा ठोस विचार अद्याप केलेला नाही,असेही त्यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, किमान समान कार्यक्रमाच्या अजेंड्यावर भाजप सोबत आघाडी केली होती. परंतु, त्यांच्यासोबत गेल्यानंतर अपयशी 'गुजरात मॉडेल'ची आभासी प्रतिमा समोर आली. 'किमान समान'ला बगल देण्याबरोबरच भूमीअधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करून त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळेच त्यांची संगत सोडली.पुन्हा त्यांची संगत करण्याचा विचार नाही.

राज्यातील महाविकास आघाडीचीही आम्ही दोन वर्षे सोबत केली.त्यांनीही अनाधिकाराने  ऊसाच्या  'एफआरपी'चे तुकडे केले, भूमीअधिग्रहण व  भरपाईच्या कायद्यात बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळे त्यांच्याशीही दोन वर्षांपासून संबंध तोडले आहेत,असेही त्यांनी सांगितले.

म्हणूनच सगळ्यांपासून 'संन्यास'

लग्नानंतर काहीकाळाने वैराग्य येते.तसे अनुभावाअंती आम्ही सगळ्याच आघाड्यांपासून संन्यास घेतला आहे, त्यामुळे नव्या लग्नाचा विचार सध्या नाही असेही शेट्टींनी स्पष्ट केले.

नेत्यांनी 'लायकी'तपासून पहावी

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहून लोक मतदान कार्ड जाळायला लागले आहेत. निवडणूक आयोगाने बोटाला 'शाई ऐवजी चुना' लावावा, असं म्हणायला लागले आहेत. सामान्य माणसांच्या अशा प्रतिक्रिया असतील तर सर्वच राजकीय नेत्यांनी अंतर्मुख होऊन आपली काय लायकी आहे, हे एकदा तपासून पहावे, असेही शेट्टी म्हणाले.

Web Title: No more experimenting with a new front says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.