‘आत्मक्लेश’ नको आता रस्त्यावरीलच लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:00+5:302021-06-09T04:31:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मराठा आरक्षणाची लढाई खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनपासून सुरू होत आहे. आरक्षणासाठी मराठा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : मराठा आरक्षणाची लढाई खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली १६ जूनपासून सुरू होत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने खूप संयमाने घेतले आहे, आता ‘आत्मक्लेश’ न करता आक्रमकपणे रस्त्यावरील लढाई सुरू करावी, सरकारला धडकी भरेल, असा मोर्चा काढण्याचे नियोजन करावे, असा सूर सकल मराठा समाज बैठकीत उमटला.
मराठा आरक्षणासाठी मोर्चा होत असून त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी कोल्हापुरात झाली. बाबा पार्टे म्हणाले, संभाजीराजेंनी आत्मक्लेश आंदोलन करू नये. त्याऐवजी सरकारवर दबाव येईल, अशा प्रकारचे आंदोलन हातात घेतले पाहिजे. महेश जाधव म्हणाले, संभाजीराजेंनी राज्य सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी काळात या मागण्या मान्य न झाल्यास विराट मोर्चा काढून सरकारला हादरून सोडू या.
निवास साळोखे म्हणाले, मोर्चात सहभागी होण्यासाठी घर टू घर जाऊन प्रबोधन करा. संभाजीराजेंच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज आहे, हे दाखवून देण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने कामाला लागा. फत्तेसिंह सावंत म्हणाले, ‘ओबीसी’चे नेते थेट अंगावर येत असताना मराठा नेते मात्र बचावात्मक काम करत आहेत. आमदार खासदार म्हणून कोणी येऊ नये, मराठा म्हणून मोर्चात सहभागी व्हावे.
१६ जूनच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी मंदिर येथे मराठा समाजातील प्रमुखांची बैठक आयोजित केली असून तिथेच मोर्चाची दिशा ठरवली जाईल, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.
बैठकीला सचिन तोडकर, बाळ घाटगे, सुशील भांदीगरे, दिलीप देसाई, स्वप्निल पार्टे आदी उपस्थित होते.
मागासवर्गीय आयोग रद्द करावा
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेला मागासवर्गीय आयाेगात एकही मराठा सदस्य नाही. उलट जे मराठा आरक्षणाला विरोध करतात तेच ‘ओबीसी’चे सदस्य आहे. त्यामुळे हा आयोग रद्द करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
फोटोसाठी नको भूमिका जाहीर करा
जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी मोर्चात केवळ फोटोसाठी सहभागी होणार असतील तर येऊच नये. तिथे आल्यानंतर तुमची भूमिका जाहीर करायला हवी, असेही यावेळी सांगण्यात आले.
फोटो ओळी : मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकल मराठा समाज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वप्निल पार्टे, फत्तेसिंह सावंत, महेश जाधव, सचिन तोडकर, दिलीप पाटील, दिलीप देसाई, सुजित चव्हाण, निवास साळोखे आदी उपस्थित होते. (फोटो-०८०६२०२१-कोल-मराठा) (छाया- नसीर अत्तार)