आता पुन्हा ‘एमपीएससी’च्या तारखेत बदल नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:51+5:302021-03-13T04:44:51+5:30

कोल्हापूर : आता कोणतेही कारण पुढे करून राज्य सरकार अथवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पुन्हा पूर्वपरीक्षेच्या तारखेत बदल ...

No need to change the date of MPSC again | आता पुन्हा ‘एमपीएससी’च्या तारखेत बदल नको

आता पुन्हा ‘एमपीएससी’च्या तारखेत बदल नको

Next

कोल्हापूर : आता कोणतेही कारण पुढे करून राज्य सरकार अथवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पुन्हा पूर्वपरीक्षेच्या तारखेत बदल करू नये. आमची मानसिकता बिघडवू नये, अशा प्रतिक्रिया कोल्हापुरातील परीक्षार्थींनी शुक्रवारी व्यक्त केल्या.

कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे कारण सांगत रविवारी (दि. १४) होणारी पूर्वपरीक्षा एमपीएससीकडून पुढे ढकलण्यात आली. त्याबाबतचा निर्णय गुरुवारी दुपारी आयोगाने जाहीर केल्यानंतर कोल्हापूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संतप्त झाल्या. त्यांनी सायबर चौकात रास्ता रोको, तर बिंदू चौकामध्ये ठिय्या आंदोलन केले. राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आठवड्यात परीक्षा होईल. त्याची तारीख शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. त्यानुसार आयोगाने दि. २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर केला. रविवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलली आणि त्याची तारीख दुसऱ्या दिवशी जाहीर झाल्याने कोल्हापूर केंद्रावरून परीक्षा देण्यासाठी नोंदणी केलेल्या १४ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एक आठवड्याने परीक्षा होणार असल्याने त्यांच्याकडून अभ्यास, तयारी सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया

कोरोना, लॉकडाऊन, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाचव्यांदा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता २१ मार्चला परीक्षा नियोजित केली आहे. आमच्या भावनांचा विचार करून सरकारने त्यादिवशीच परीक्षा घ्यावी.

-अनुजा बकरे, कोल्हापूर

एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी सामान्यत: मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. परीक्षा पुढे गेली की, त्यांचा तयारीचा खर्च आणि मानसिक तणाव वाढतो. यूपीएससी, बँकिंग आदी परीक्षा होतात, मग एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवरच अन्याय का?

-गौरी एरूडकर, सरवडे

अचानक परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाने आम्हा परीक्षार्थींची मानसिकता बिघडली. आता आठ दिवसांनी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाल्याने दिलासा मिळाला. आता पुन्हा ‘एमपीएससी’च्या तारखेत बदल होऊ नये.

-विशाल पाटील, कसबा बावडा

विद्यार्थी एकजुटीचा विजय झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांशी सरकारने खेळू नये. परीक्षेच्या निर्णयात पुन्हा बदल करू नये.

-महेश पाटील, तिरपण

Web Title: No need to change the date of MPSC again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.