नको दिवाळी, नको दवा, त्यांना हवा फक्त नात्याचा ओलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:38 PM2018-11-12T17:38:24+5:302018-11-12T17:43:03+5:30

आपल्याच माणसांनी दूर केल्याचे शल्य इतकी वर्षे आयुष्याच्या सायंकाळी उरात सांभाळणाऱ्या त्या वृध्दांनी रुग्णालयात पाउल टाकताच मात्र धीर सोडला आहे. नातेवाईक नसल्याचे सांगणाऱ्या या वृध्दांनी ते हयात असल्याचे सांगताच त्यांना सांभाळणाऱ्यांचे मन सुन्न झाले. एकेकाळी ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, त्यांचे एकदा तरी दर्शन व्हावे, यासाठी त्यांचा जीव अडकला आहे, त्यांनी येउन भेट घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

No need for Diwali, no medicine, they just wind up the relationship | नको दिवाळी, नको दवा, त्यांना हवा फक्त नात्याचा ओलावा

नको दिवाळी, नको दवा, त्यांना हवा फक्त नात्याचा ओलावा

Next
ठळक मुद्देनको दिवाळी, नको दवा, त्यांना हवा फक्त नात्याचा ओलावारुग्णालयातील त्या वृध्दांचा नातेवाईकांमध्ये अडकला जीव

कोल्हापूर : आपल्याच माणसांनी दूर केल्याचे शल्य इतकी वर्षे आयुष्याच्या सायंकाळी उरात सांभाळणाऱ्या त्या वृध्दांनी रुग्णालयात पाउल टाकताच मात्र धीर सोडला आहे. नातेवाईक नसल्याचे सांगणाऱ्या या वृध्दांनी ते हयात असल्याचे सांगताच त्यांना सांभाळणाऱ्यांचे मन सुन्न झाले. एकेकाळी ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, त्यांचे एकदा तरी दर्शन व्हावे, यासाठी त्यांचा जीव अडकला आहे, त्यांनी येउन भेट घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिरोळ तालुक्यातील घोसरवाड गावातील जानकी वृद्धाश्रमातील दोन वृध्द सध्या सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि दोनजण कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत आहेत. त्यांना दिवाळीचा फराळ दिला तरी, त्यांच्या चेहऱ्यावरील उदासी जात नव्हती. यामुळे अस्वस्थ झालेले रेंदाळचे सामाजिक कार्यकर्ते मोहन खोत यांनी याबाबत बाबासाहेब पुजारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा जीव त्यांच्या नातेवाईकांमध्ये अडकला असल्याचे सत्य समजले.

आयुष्यभर त्यांच्या खस्ता खाल्ल्या, आता संध्याछायेला त्यांनी वृध्दाश्रमात सोडले. तेथे खाण्यापिण्याची ददात नाही, खंत त्याची नाही, पण ज्यांच्यासाठी अजून जीव तग धरुन आहे, त्या आप्तेष्टांचीच भेट होत नसल्याचे सांगून त्या वृध्दांच्या नजरा अश्रूंनी भरुन गेल्या.

दिवाळीच्या निमित्ताने या आश्रमातील वृध्दांसाठी फराळ घेऊन जाणाऱ्या मोहन खोत यांना ही दु:खभरी माहिती समजली, त्यांनी ती लोकमतकडे मांडली. घोसरवाडसारख्या छोट्याश्या खेड्यात अल्पशा जागेत बाबासाहेब पुजारी आणि कस्तुरी दानवाडे या बहीण-भावांनी विधवा आईच्या सहकार्याने या वृद्धाश्रमाची काही वषापूर्वी सुरुवात केली आहे. सुरुवातीला एका वृद्धाला घेऊन सुरु केलेल्या या वृद्धाश्रमात सध्या सतरा स्त्री-पुरुष दाखल आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी कोणतीही रक्कम आकारली जात नाही.

शेजारची मुले आई-वडिलांना साभाळत नाहीत, ज्यांचे अन्न-पाण्या वाचून हाल होत आहेत अशा वृद्धांची कीव आल्याने अनेकांनी बेवारस असल्याचे सांगून त्यांना या वृध्दाश्रमात सोडले. प्रत्यक्षात त्यांचे नातेवाईक हयात आहेत, पण त्यांना सांभाळण्याऐवजी या वृध्दाश्रमात सोडून गेले आहेत. झाले-गेले विसरुन आपल्या नातेवाईकांनी भेटायला यावे, ही आस या वृध्दांना रुग्णालयात अखेरच्या क्षणी आहे. घरची माणसे दिवाळी साजरी करत असताना ते त्यांच्या कुटूंबियासमवेत नाहीत, ही खंत त्यांना आहे.


अखेरचे कळवूनही नातेवाईकांचे दुर्लक्ष

आमच्या वृध्दाश्रमात राहिलेल्या या वृद्धांच्या नातेवाइकांनी खर्चासाठी एकही रक्कम दिलेली नाही. इतकेच काय, या आश्रमात ते असल्याचे माहित असताना एकदाही भेट दिलेली नाही. या वृद्धांना कोणी नातेवाईक नाहीत असे समजून आम्ही त्यांची सेवा करीत आहोत. पण आज अखेरच्या क्षणी त्यांचा धीर सुटला आहे. आपले नातेवाईक आहेत, आणि त्यांनी एकदा तरी भेटावे अशी आस लावून ते बसले आहेत. त्यांची ही अवस्था पाहून आम्हीही त्यांचे नातेवाईक शोधून काढून त्यांना आपले आई-वडील अखेरची घटका मोजत आहेत. एकदातरी त्यांना भेटून जा, असा वारंवार निरोप देऊनही ते भेटायला येत नाहीत. अशावेळी आम्ही त्यांना नात्याचा हा ओलावा कोठून द्यायचा, असा सवाल वृध्दाश्रमाचे संचालक बाबासाहेब पुजारी यांनी केला आहे.

 


अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा असल्या तरी आपल्या माणसांचे प्रेम मिळण्याची प्रत्येकाला गरज आहे. भौतिक गरजा पूर्ण झाल्या की माणूस सुखी झाला असे समजतो. पण ...हे खरे नाही, हे या वृध्दांची भेट घेतल्यानंतर समजले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची शेवटच्या घटकेला तरी आता भेट घ्यावी, असे कळकळीचे आवाहन मी करत आहे.
मोहन मनोहर खोत,
मानेनगर, रेंदाळ, ता. हातकणंंगले

Web Title: No need for Diwali, no medicine, they just wind up the relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.