राजकारणात कोणी कधीच संपणार नाही
By admin | Published: January 12, 2017 01:23 AM2017-01-12T01:23:37+5:302017-01-12T01:23:37+5:30
समरजितसिंह घाटगे : कमळ फुलवण्यासाठी तयार रहा; निढोरीमध्ये मेळावा
मुरगूड : कागल तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून नकारात्मक राजकारण सुरू आहे. स्व. विक्रमसिंह घाटगे यांनीही याला विरोध केला पण त्यांचीही विरोधकांनी टिंगल केली, पण विकासात्मक राजकारणाशिवाय पर्याय नाही. मी कोणाला संपवण्यासाठी राजकारणात सक्रिय नाही. राजकारण्यांनी संपवण्याची भाषा बंद करावी. राजकारणामध्ये कोणी कधीच संपत नाही, असा इशारा राजर्षी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला
निढोरी (ता. कागल) येथे छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या वतीने आयोजित उस विकास परिसवांद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुहासिनीदेवी घाटगे, शाहू दूध संघाच्या अध्यक्ष नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज व समरजितसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन समरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. ऊस विकास परिसंवाद अंतर्गत व्हीएसआय पुणे येथील वरिष्ठ अभ्यासक डॉ. डी. बी. फोंडे यांनी सभासदांना एकरी उत्पादन वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले.
घाटगे पुढे म्हणाले, बिद्री-बोरवडे मतदारसंघामध्ये घाटगे गटाची ताकद नगण्य आहे. अशा बाता नेहमी ऐकायला मिळत होत्या; पण आजच्या सभेच्या गर्दीने हे खोटे असल्याचे दाखवून दिले आहे. शाहू कारखान्याने सभासदांच्या हितासाठी नेहमी निर्णय घेतले आहेत. राजकारणामध्ये आपल्या गटाचा स्वाभिमान जिवंत आहे. कोणतीही सत्ता नसताना कागलमध्ये पन्नास टक्के मते आम्हाला मिळाली, नेहमी भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि विकासासाठी लढत राहणार असून, राज्यात भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे कागलमध्येही जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.
यावेळी सुहासिनीदेवी घाटगे, सुप्रिया पाटील (भडगाव), संगीता विधाते (सावर्डे बुद्रुक), जयश्री पाटील (उंदरवाडी) यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी प्रकाश कारंडे, बाळासो मोरबाळे, दिग्विजय चौगले, संभाजी घराळ, रोहिणी शिंदे, शुभदा चव्हाण इलेव्हन फायटरचे सर्व सदस्य यांचा समरजित घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घाटगे, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय खराडे, माजी संचालक सुनीलराज सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, वाय. एस. पाटील, अविनाश पाटील, कार्यकारी संचालक विजय औताडे, संजय पाटील, ‘बिद्री’चे संचालक वसंतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, विलास गुरव, सत्यजित पाटील उपस्थित होते. स्वागत शाहूचे संचालक डी. एस. पाटील यांनी केले. आभार एम. डी. पाटील यांनी मानले. सूत्र संचालन राजेंद्र मालुमल यांनी केले.
महिलांसाठी ‘शाहू’ सज्ज
मेळाव्याला महिलांची तोबा गर्दी झाली होती. या अनुषंगाने समरजित घाटगे यांनी महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये राज्यात महिलांसाठी पहिली श्रीमंत विजयादेवी घाटगे महिला ठिबक योजना सुरू केल्याचे सांगितले. याशिवाय महिला सभासदांसाठी मुलाखती, वेगळा परिसंवाद अशा अनेक गोष्टींनी शाहू कारखाना महिलांसाठी सज्ज असल्याचे घाटगे यांनी सांगताच प्रचंड टाळ्या पडल्या
आमचा उपक्रम
तीन पिढ्यांपर्यंत
तालुक्यात अनेकजण अनेक उपक्रम सुरु करतात, पण ते काही दिवसांत बंद पडतात, पण आमचा शाहू कारखाना ज्यावेळी एखादा उपक्रम सुरु करतो, तो उपक्रम मात्र तीन पिढ्यांपर्यंत टिकतो. त्यामुळे आमच्या
योजनांवर कोणीही टीकात्मक बोलू नये, असे घाटगे यांनी सांगितले.