पॅचवर्क नको, पूर्ण रस्ते करा - वाहनधारक महासंघयांच्यावतीने मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:36 AM2019-11-27T11:36:46+5:302019-11-27T11:38:42+5:30
यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे.
कोल्हापूर : महापालिकेकडून शहरातील खराब झालेले रस्त्यांचे पॅचवर्क सुरू आहे. त्यामुळे पुन्हा रस्ता खराब होऊन खड्डे पडणार आहेत. तरी पॅचवर्क नको, पूर्ण रस्ते करा, अशी मागणी जिल्हा वाहनधारक महासंघ यांच्यावतीने महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे. पॅचवर्क करून कायमचा प्रश्न सुटणार नाही. चांगल्या रस्त्यांसाठी नव्यानेच रस्ते झाले पाहिजेत. यावेळी महापौर लाटकर म्हणाल्या, एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेल्या ७५ लाखांच्या निधीमधून रस्ते करण्यात येत आहेत. जेथे पॅचवर्कने रस्ता होऊ शकतो, तेथे पॅचवर्क केले जाईल. जेथे पूर्ण रस्ते करावे लागणार आहेत, तेथे पूर्ण रस्ते करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी पूल ते गंगावेश हा रस्ता नव्याने करणार आहे. यावेळी अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, दिनमहमंद शेख, इंद्रजित आडगुळे, तानाजी पाटील उपस्थित होते.
डांबराचा दर्जा तपासा
वाहनधारक संघटनेकडून पॅचवर्क करताना वापरण्यात येणारे डांबर निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी महापालिका प्रशासनाने दर्जेदार रस्ते केले जातील, रस्ते सुरू असतानाच डांबराची तपासणी केली जाईल, अशी ग्वाही दिली.