जागा अजून ताब्यातच नाही-- लाल फितीतमहामानवाचे स्मारक : भाग -२
By admin | Published: March 25, 2015 12:10 AM2015-03-25T00:10:24+5:302015-03-25T00:42:35+5:30
माणगावातील स्थिती : आराखडा नसल्याने निधी अधांतरी
विश्वास पाटील - कोल्हापूर
माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हवी असणारी जागा देण्यास संबंधित शेतकऱ्यांची संमती आहे; परंतु ही जागा आजही जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आलेली नाही. जागा ताब्यात घेऊन त्यासाठीचा आराखडा निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त होण्याची गरज आहे; परंतु या कोणत्याच पातळीवर गांभीर्याने काम झालेले नाही. त्यामुळे स्मारक होणार कधी हे सांगणेच अवघड बनले आहे.
माणगाव येथील या स्मारकासाठी २००९ मध्ये पाच कोटींचा नियतव्यय शासनाने मंजूर केला. त्यानंतर जागेचा शोध सुरू झाला. सद्य:स्थितीत गावातील गट नं. ८७ मधील १ हेक्टर ८२ आर ही जमीन डॉ. आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा सुमारे दहांहून जास्त शेतकऱ्यांची आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्र करून ही जागा देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु प्रत्यक्षात ही जागा आजही शासनाच्या ताब्यात नाही. समाजकल्याण विभाग जागेचा ताबा तहसीलदार यांच्याकडे असल्याचे सांगतो; परंतु प्रत्यक्षात तहसीलदारांनी जागा ताब्यात नसल्याचे तथापि ती घेण्यात अडचण नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. समाजकल्याण कार्यालयाने पत्र क्रमांक १२१७ (दि. २८ आॅगस्ट २०१४) अन्वये जमिनीची कब्जेपट्टी पंचनामा व सातबारा पत्रके असणारे भोगवटादार व त्यांचे वारस, आदींनी दिलेली संमतीपत्रे, आदी कागदपत्रे समाजकल्याण आयुक्त यांच्या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविली आहेत. त्यालाही आता आठ महिने झाले; परंतु त्यांच्याकडून त्याबद्दल पुढेच काहीच कार्यवाही झालेली नाही.
स्मारकासाठी जागा, त्यासाठी निधी व तज्ज्ञांनी केलेला आराखडा अशा तिन्ही पातळ्यांवर या कामाचा पाठपुरावा झाला तरच स्मारक अस्तित्वात येऊ शकेल. गेल्याच महिन्यात २८ फेबु्रवारीस समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना स्मारकाच्या जागेसाठी तातडीने प्रस्ताव द्या. त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू होईल. बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत समाजनिर्मितीसाठी अशी स्मारके प्रेरणादायी ठरतील, असे भाषणही त्यांनी ठोकले; परंतु प्रत्यक्ष स्मारकाचे काम पुढे सरकलेले नाही.