मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती नको : खासदार संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:48 PM2020-09-17T16:48:18+5:302020-09-17T16:54:17+5:30
संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
कोल्हापूर : संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना@YuvrajSambhaji राजेंचे आवाहन...#MarathaReservationpic.twitter.com/QxpYVbyWow
— Chhatrapati Sambhajiraje FC (@ChhSambhajiraje) September 14, 2020
मी शासनाला एकच सांगू इच्छितो की, मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार आहे. जे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती काढू नये.
सध्याच्या परिस्थितीत नोकरभरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
कुटिल डाव तर नाही ना?
मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असूनसुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटिल डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी या पत्रात म्हटले आहे.