‘सर्किट बेंच’साठी पुण्याचा प्रस्ताव नको
By admin | Published: March 3, 2017 01:03 AM2017-03-03T01:03:26+5:302017-03-03T01:03:26+5:30
बार असोसिएशनच्या सभेत निर्णय : कोल्हापूरसाठी आग्रह; पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव; सर्किट बेंच मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
कोल्हापूर : कोल्हापूरसह पुण्यात सर्किट बेंच व्हावे, असा संयुक्त मागणीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत धुडकावत फक्त कोल्हापूरसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा आग्रह धरण्यात आला.
सर्किट बेंचप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर टोलप्रमाणे हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुल येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी हे निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे होते. प्रमुख उपस्थिती सचिव अॅड. सर्जेराव खोत, अॅड. संदीप चौगुले, अॅड. विवेक शुक्ल, अॅड. मेघा पाटील, अॅड. प्रशांत पाटील, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. अजित मोहिते, भाजपचे माजी महानगराध्यक्ष महेश जाधव, अॅॅड. संपतराव पवार, अॅड. विवेक घाटगे, आदींची होती.
कोल्हापूरसह पुण्यात सर्किट बेंच व्हावे, अशा संयुक्त मागणीचा प्रस्ताव साताऱ्यातील वकिलांकडून चर्चेत आला होता. याला तीव्र विरोध करीत कोल्हापूरच्या वकिलांनी, पालकमंत्री सकारात्मक असल्याने कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे असा प्रस्ताव शासनाला न पाठविता फक्त कोल्हापूरसाठी आग्रह धरावा. यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती योग्य तो निर्णय घेतील. त्याचबरोबर सर्वपक्षीय समितीलाही याबाबत कल्पना द्यावी, अशा भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
अॅड. प्रकाश मोरे म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सकारात्मक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य न्यायाधीशांची बैठक होणार आहे. त्या बैठकीला पालकमंत्री व मंत्री गिरीश बापट जाणार आहेत. या बैठकीत आपण कोल्हापूरसाठी मुख्य न्यायाधीशांकडे आग्रह धरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. अॅड. राजेंद्र किंकर म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. इतर प्रस्तावांवर चर्चा करायचे कारण नाही.
अॅड. विवेक घाटगे म्हणाले, या सरकारचा सर्किट बेंच व्हावे या मागणीला पाठिंबा आहे. त्यामुळे या सरकारच्या काळात लवकरात लवकर हा प्रश्न सुटण्याची गरज आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारचा कोल्हापूरच्या सर्किट बेंचला विरोध असल्याचे दिसून आले. टोलप्रमाणे सर्किट बेंचचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील. महेश जाधव म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच मिळणार यात शंका नाही; कारण पालकमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे वकिलांसह येथील जनतेच्या आंदोलनाला नक्की यश मिळेल. यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, ते करून लवकरच पालकमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू. अॅड. सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविक व आभार मानले. (प्रतिनिधी)
भाजप कायदा आघाडीचेही उपोषण
कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी गेल्या ९२ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणात गुरुवारी भाजप कायदा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. बावडा रोडवरील न्यायसंकुलासमोर हे आंदोलन सुरू आहे. भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते गुरुवारी दिवसभराच्या उपोषणाची सांगता झाली. या उपोषणात महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजप कायदा आघाडीचे अॅड. विठोबा जाधव, गुरुदत्त पाटील, मोहन पाटील, तेजस साटम, मिलिंद जोशी, विवेकानंद पाटील, सत्यजित कुंभार, संदीप पवार, संदेश कुलकर्र्णी, विजय पाटील, उल्हास पवार, युवराज मस्कर, रोहित पाटील, प्रतीक्षा कांबळे, आदी सहभागी झाले होते.
कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुल येथील शाहू सभागृहात गुरुवारी कोल्हापूर बार असोसिएशनच्या सभेत अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. प्रशांत पाटील, अॅड. मेघा पाटील, अॅड. सर्जेराव खोत, आदी उपस्थित होते.