Kolhapur: शिक्षणाच्या मंदिरात नको भगवा, हिरवा, निळा; शांतीसाठी स्त्री-संघर्षची मुक निदर्शने
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 7, 2023 05:22 PM2023-09-07T17:22:47+5:302023-09-07T17:23:28+5:30
संविधानानुसार मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याची मागणी
कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरून भडकवून ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. पूर्वनियोजनातून शिक्षकांना वेठीला धरणे, शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनावर दबाब आणून शैक्षणिक वातावरण बिघडवले जात आहे. हे प्रकार थांबवून शिक्षण संस्थांमध्ये संविधानाला अनुसरूनच प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करावी अशी मागणी शांतीसाठी स्त्रीसंघर्ष या संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. यावेळी महिलांनी गळ्यात फलक अडकवून मुक निदर्शने केली.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटनांंची एकत्र बैठक घेऊन सखोल चर्चा घडवून आणावी व मार्गदर्शक तत्वे निश्चित करावीत. अशा घडत असल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. सरोज पाटील, मीना सेशू, डॉ. मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर, भारती पोवार, सीमा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले. यावेळी दीपा शिपुरकर, स्मिता वदन, प्रणिता माळी, शुभदा हिरेमठ, किरण देशमुख, अलका देवलापूरकर यांच्यासह महिला व तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.