शक्तीपीठ महामार्ग नकोच, १२ मार्चला विधानभवनावर मोर्चा

By पोपट केशव पवार | Updated: February 20, 2025 14:49 IST2025-02-20T14:49:28+5:302025-02-20T14:49:58+5:30

काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली.

No Shakti Peeth highway, march to Vidhan Bhavan on March 12 | शक्तीपीठ महामार्ग नकोच, १२ मार्चला विधानभवनावर मोर्चा

शक्तीपीठ महामार्ग नकोच, १२ मार्चला विधानभवनावर मोर्चा

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या १२ मार्चला अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या कोल्हापुरात आयोजित राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली. यावेळी १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नसल्याची शपथ घेतली.

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील पुढी दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात आयोजित बैठकीला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. आमदार सतेज पाटील म्हणाले, हा महामार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. याला कोल्हापुरातून सुरुवातीला विराेध झाला. निवडणुकीत याची धास्ती वाटल्याने केवळ कोल्हापुरमध्ये तो रद्द झाल्याची आवई उठवली. मात्र, सध्या रेखांकन जाहीर केली आहेत. त्यामुळे या महामार्गाला कोल्हापूरकर ताकदीने विराेध करतील. कंत्राटदारधार्जिना हा महामार्ग असून येत्या अधिवेशनात महाविकास आघाडीचे आमदार या महामार्गाला कडाडून विरोध करतील.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ठराविक उद्योगपतींना पोसण्यासाठीच या महामार्गाचा घाट घातला जात आहे. मात्र, आम्ही तो होऊ देणार नाही.  समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे एकदा जाहीर करावे. यावेळी गजेंद्र येळकर (लातूर) , विजयकुमार पाटील (सोलापूर),शांतीभूषण कच्छवे (परभणी), घनश्याम नलवडे (सांगली), सूरज माळेवार (हिंगोली), कचरु मुधोळ (नांदेड), संभाजी फडतारे (धाराशिव), सुदर्शन पडवळ (धाराशिव) यांनी मनोगत व्यक्त केले.  

१ मार्चपूर्वी आमदारांची पत्रे घेणार, भूमिका कळणार

एकीकडे मुख्यमंत्री आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करत आहेत तर दुसरीकडे काही आमदार शक्तीपीठाला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आमदारांचे शक्तीपीठाला समर्थन आहे की विरोध याचे लेखी पत्र त्यांच्याकडून येत्या १ मार्चपर्यंत घ्या अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली. त्याला सर्व शेतकऱ्यांनी सहमती दिली.

Web Title: No Shakti Peeth highway, march to Vidhan Bhavan on March 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.