Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास जागा मिळेना, दीड कोटीचा निधी मिळूनही हतबलता

By भीमगोंड देसाई | Published: January 11, 2023 01:47 PM2023-01-11T13:47:07+5:302023-01-11T13:48:06+5:30

निधी देण्याची घोषणा करून जागा मिळवून दिली नाही तर स्वच्छतागृह कागदावरच राहणार

No space available for toilet in Ambabai temple area, desperation despite funding of 1.5 crores | Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास जागा मिळेना, दीड कोटीचा निधी मिळूनही हतबलता

संग्रहीत फोटो

googlenewsNext

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात सध्या एकही सार्वजनिक स्त्री, पुरुष स्वच्छतागृह नसल्याने पर्यटक, भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी स्वच्छतागृहासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे, पण स्वच्छतागृह बांधणार कोठे हे अनिश्चित आहे. परिणामी अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहास कोणी जागा देता जागा अशी याचना करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. या विषयात महापालिका हतबल झाली आहे.

मंदिर परिसरातील जुन्या प्रांत कार्यालयाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह होते. ते मोडकळीस आल्याने पाडून त्याच ठिकाणी नवीन बांधण्याचे काम महापालिकेतर्फे केले जात होते, पण याला विरोध झाल्याने ते काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. यामुळे सध्या परिसरात स्वच्छतागृह नाही.

यामुळे लांबचा प्रवास करून आलेल्या महिला पर्यटकांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यांना नाईलाजास्तव जवळच्या घरमालकांना थोडं बाथरूमला जाऊन येतो, अशी विनवणी करावी लागत आहे. इतकी लाजिरवाणी वेळ महिला भाविकांवर आली तरीही स्वच्छतागृहांना जागा मिळवण्यासाठी ठोस पावले राज्यकर्त्यांकडून उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे.

स्वच्छतागृहासाठी पालकमंत्री केसरकर यांनी निधी देण्याची घोषणा करून जागा मिळवून दिली नाही तर स्वच्छतागृह कागदावरच राहणार आहे.

पागा इमारतीमध्ये नियोजन

नवीन स्वच्छतागृह पागा इमारतीमध्ये बांधण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पण ही इमारत हेरिटेज आहे. यामुळे स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी लागणार आहे. ही प्रकिया दिरंगाईची आणि वेळखाऊ आहे. यामुळे पागा इमारतीमध्येही तातडीने स्वच्छतागृहासाठी जागा मिळणार नाही.

बिंदू चौकातील पार्किंगमध्ये शक्य

बिंदू चौकातील महापालिकेच्या पार्किंगमध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा आहे. या ठिकाणी पार्किंग स्थळ विकसित करण्याच्या आराखड्यात याचा समावेश आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून या ठिकाणी वेगळे स्वच्छतागृह कसे आणि कोठे बांधायचे? असा प्रश्न उभा राहिला आहे.

अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. पागा इमारतीमध्ये जागा आहे का याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे.  - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

Web Title: No space available for toilet in Ambabai temple area, desperation despite funding of 1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.