ना टाळ, ना मृदंग, ना विठुरायाचा गजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:15+5:302021-07-21T04:17:15+5:30
इचलकरंजी : वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा असतो. लाखो भक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात; परंतु कोरोना ...
इचलकरंजी : वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा असतो. लाखो भक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात; परंतु कोरोना महामारीमुळे प्रशासनाने आषाढी एकादशीवर अनेक निर्बंध आणले. त्यामुळे शहरातील विठ्ठल मंदिर व एकादशीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेक मंदिरे बंद असल्याने भक्तांनी लांबूनच दर्शन घेतले.
शहरासह राज्यात अद्याप कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आषाढी एकादशी साजरी करण्यास कडक निर्बंध लागू केले. यामुळे शहरातील विठ्ठल मंदिरे बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले. मात्र, मंदिर पुजाऱ्याने विठ्ठलाची पहाटेपासूनच विधिवत पूजाअर्चा केली. मंदिराला फुलांनी सजविले होते. विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. या भक्तिमय वातावरणामुळे विठुरायाचे रूप खुलून दिसत होते. कोरोनामुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने मुलांनाही वारी काढता आली नाही. काही जणांनी घरीच फोटो व मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली. यावेळी मंदिराजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटो ओळी
२००७२०२१-आयसीएच-०१
थोरात चौक परिसरातील मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक पूजा मांडण्यात आली, तसेच गाभाऱ्यात फुलांची सजावट केली होती.
छाया-उत्तम पाटील