शेपटीने कुत्र्याला कसे वागावे हे सांगण्यासारखे -एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:06 AM2019-11-24T01:06:21+5:302019-11-24T01:06:26+5:30

विश्र्वास पाटील । कोल्हापूर : ‘भाजपसोबत चला, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल,’ हा अजित पवार यांचा सल्ला म्हणजे शेपटीने कुत्र्याला ...

-No telling the tail how to treat a dog. D. Patil | शेपटीने कुत्र्याला कसे वागावे हे सांगण्यासारखे -एन. डी. पाटील

शेपटीने कुत्र्याला कसे वागावे हे सांगण्यासारखे -एन. डी. पाटील

Next

विश्र्वास पाटील ।
कोल्हापूर : ‘भाजपसोबत चला, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल,’ हा अजित पवार यांचा सल्ला म्हणजे शेपटीने कुत्र्याला कसे वागावे, हे सांगण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून, तो चुलते शरद पवार यांच्या राजकीय चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असेही प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात शनिवारी जी राजकीय उलथापालथ झाली, त्या संदर्भात प्रा. पाटील म्हणाले, ‘अजित यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार करायला हवा होता. एकटा अजित पवार काय करू शकतो? हा पवार यांचाच डाव असेल, अशी साशंकता लोकांच्या मनांत निर्माण होऊ शकते. अजित यांच्या वर्तणुकीचा दोष शरद पवार यांना येणार आहे, याचे भान त्यांनी बाळगायला हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकूण राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात शरद पवार यांच्यासोबतचे त्यांचे नाते हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांना वजा करून अजित यांचे स्थान काय राहते, याचेही आत्मचिंतन त्यांनी या निमित्ताने करावे.’
राज्यात अगोदर भाजप-शिवसेनेने सत्तास्थापनेचा मोठा घोळ घातला. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सरकार सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांनी अशी टोकाची भूमिका घ्यायला नको होती. भाजपसोबत जाण्यासाठी ते इतके अगतिक का झाले, या कारणांचाही शोध घ्यायला हवा, असेही प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी भूमिकेशी एकनिष्ठ राहावे
अजित पवार यांची शरद पवार यांनी कोणतीही गय करू नये. राज्यात सरकार कुणाचेही येवो; परंतु त्यांनी शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन जे राजकीय पाऊल टाकले आहे, त्यातून त्यांनी माघार घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचे काहीही परिणाम झाले तरी शरद पवार यांनी या भूमिकेला तडा जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये, असाही सल्ला प्रा.पाटील यांनी दिला आहे.

Web Title: -No telling the tail how to treat a dog. D. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.