Kolhapur News: जोतिबा यात्रेतील कोणतीही परंपरा खंडित होणार नाही, पण...; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:10 PM2023-03-28T12:10:11+5:302023-03-28T12:10:38+5:30

४८ कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण यात्रेचे चित्रीकरण तर १५० एस.टी. बसेसची सोय

No tradition in Jotiba Yatra will be broken says Collector Rahul Rekhawar | Kolhapur News: जोतिबा यात्रेतील कोणतीही परंपरा खंडित होणार नाही, पण...; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

Kolhapur News: जोतिबा यात्रेतील कोणतीही परंपरा खंडित होणार नाही, पण...; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

googlenewsNext

जोतिबा : जोतिबा चैत्र यात्रेतील कोणत्याही परंपरा खंडित न करता जुन्या परंपरा कायम ठेवत भाविकांची सोय करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे यात्रा काळात केमिकल गुलाल, भेसळयुक्त खाद्य पदार्थांची तपासणी तातडीने करावी, अन्यथा अन्न औषध प्रशासनावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला.

५ एप्रिलला होणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त नियोजनाची आढावा बैठक जोतिबा येथील यात्री निवासमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी काही विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हाधिकारी यांनी चैत्र यात्रेत दारू पिऊन सासनकाठीधारक सहभागी झाल्यास सासनकाठीचा परवानाच रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे जोतिबा मंदिरात जनावरे आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. केमिकल गुलाल, भेसळयुक्त पदार्थांवर तपासणी न करता भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत झापले. जागेवर जाऊन पेढा, बर्फीचे नमुने घेऊन तपासणी करावी, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

वाहतूक पोलिसांनी भाविकांकडून कोणत्याही प्रकारची पावती घेऊ नये. भाविकांची अडवणूक करू नये अशा सूचना जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिल्या. अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून अडचणीवर तत्काळ तोडगा काढावा. पार्किंग, माणसी कराचे जादा पैसे न घेण्याची सूचना जि. प. कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह चव्हाण यांनी दिल्या. आरोग्य विभाग १८ रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणार असून, पोलिस विभाग आपत्कालीन व्यवस्थेसाठी राईट कंट्रोल, जलद कृती दल, स्ट्रायकिंग फोर्स ठेवून घातपात विरोधी तपासणीसाठी श्वानपथक ठेवणार आहे. हरवल्याचा शोध घेण्यासाठी मुस्कान, निर्भया पथक ठेवून ४८ कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण यात्रेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. एकूण १५० एस.टी. बसेसची सोय केली असून, पार्किंग जागेपासून ४० एस.टी. मोफत भाविकांना डोंगरावर सोडण्यासाठी असणार आहेत.

यात्रा काळात बीपी शुगर असणारे एस.टी. चालक वाहकांना येथील सेवेवर ठेवू नका अशी सूचना एस.टी. महामंडळाला देण्यात आली आहे. मधमाश्यांचे पोळ काढण्यासाठी मधमाशी मित्र तैणात ठेवण्यास सांगितले आहेत. यात्रेदरम्यान मोबाईल रेंजची समस्या निर्माण होते यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल कंपनीद्वारे जादा मोबाईला टॉवर उभा करण्याच्या सूचना केली आहे. बैठकीमध्ये सुनील नवाळे, आनंदा लादे, रामदास लादे, गणेश चौगले यांनी समस्या मांडल्या.

या बैठकीला पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी, पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सरपंच राधा बुणे, शहर वाहतूक नियंत्रक मनोज पाटील, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बीडकर, देवस्थान समितीचे सुजय पाटील, दीपक म्हेत्तर, आदी उपस्थित होते.

Web Title: No tradition in Jotiba Yatra will be broken says Collector Rahul Rekhawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.