दहावीची ‘कल’ नव्हे, तर ‘कळ’ चाचणी, शिक्षक, पालकांच्या प्रतिक्रिया ; विविध समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:19 PM2019-01-04T17:19:04+5:302019-01-04T17:22:51+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांची यावर्षी मोबाईलद्वारे कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, मिळत नसलेले नेटवर्क, अद्ययावत स्वरूपातील मोबाईल हॅँडसेटची कमतरता अशा समस्यांमुळे संबंधित कलचाचणी ही एक प्रकारे ‘कळ’ देणारी चाचणी ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : दहावीच्या विद्यार्थ्यांची यावर्षी मोबाईलद्वारे कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, मिळत नसलेले नेटवर्क, अद्ययावत स्वरूपातील मोबाईल हॅँडसेटची कमतरता अशा समस्यांमुळे संबंधित कलचाचणी ही एक प्रकारे ‘कळ’ देणारी चाचणी ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
शासनाने यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी अँड्रॉईड मोबाईलद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. चाचणी प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू झाली असून दि. २० जानेवारीपर्यंत ती चालणार आहे. पण, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मोबाईल उपलब्ध कसे करायचे असा प्रश्न भेडसावत आहे.
या चाचणीसाठी एका विद्यार्थ्यासाठी किमान ७५ मिनिटांचा वेळ लागत असल्याने वर्गशिक्षक, विषयशिक्षकांचा अधिक वेळ खर्च होत आहे. चाचणीसाठी ४.७ इंचांपेक्षा अधिक लांबीचा मोबाईल वापरणे आवश्यक असल्याने ते उपलब्ध करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागामधील शिक्षक, विद्यार्थ्यांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात पहिले म्हणजे नेटवर्क मिळत नसल्याची समस्या आहे. त्यासह अत्याधुनिक आवृत्तीच्या मोबाईल हॅँडसेटची कमतरता, बॅटरी क्षमता यांचा समावेश आहे.
संगणकावर चाचणी घेणे योग्य
या चाचणीमध्ये १५० प्रश्नांची उत्तरे देण्यासह अभिक्षमता चाचणीसाठी किमान ७५ मिनिटे लागतात. मोबाईल हॅँडसेटच्या माध्यमातून चाचणी देताना काळजी घ्यावी लागते. संगणकावर चाचणी घेण्याच्या तुलनेत या प्रक्रियेत अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळे संगणकावर चाचणी घेणे योग्य असल्याचे मत शिक्षकांतून व्यक्त होत असल्याचे कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी सांगितले.
ते म्हणाले, काही शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून अद्ययावत आवृत्तीचा मोबाईल चाचणीसाठी आणण्याची सक्ती केली आहे. त्याबाबत पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करताना ग्रामीण भागातील शिक्षकांना त्रास होत आहे. त्यामुळे ही कलचाचणी या शिक्षकांसाठी ‘कळ’देणारी चाचणी ठरत आहे. हा त्रास टाळण्यासाठी कलचाचणी पूर्वीप्रमाणे आॅफलाईन पद्धतीने पेपरच्या माध्यमातून अथवा संगणकावर घेण्यात यावी.
आॅफलाईनची सुविधा उपलब्ध
ही चाचणी घेण्यात मोबाईलसाठी नेटवर्क उपलब्धतेची कोणतेही अडचण नाही. कारण, आॅफलाईन पद्धतीने चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोल्हापूर विभागात चाचणीची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू आहे. त्याबाबत कोणतेही शिक्षक अथवा त्यांच्या संघटनांकडून लेखी स्वरूपात तक्रार शिक्षण मंडळाला प्राप्त झालेली नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी सांगितले.
वर्गातील सर्व मुलांची एकाचवेळी कलचाचणी घेतल्यामुळे वर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला. दोन शिक्षक कलचाचणीच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे बाकीचे वर्ग रिकामे पडू लागले आहेत.
-दत्तात्रय चौगुले,
कला शिक्षक, वाय. बी. पाटील विद्यालय.
मोबाईलद्वारे कलचाचणीमध्ये उद्दिष्ट साध्य होत असले, तरी ही प्रक्रिया वेळखाऊ आणि शिक्षक, पालकांच्या आर्थिकतेशी निगडीत आहे. यासाठी शिक्षकांना त्या अटीशी सुसंगत मोबाईल घ्यावा लागला. पालकांनाही तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली. शिवाय दिवसभर विद्यार्थ्यांच्या हाती असणारा मोबाईल आणि त्याची सुरक्षितता यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पूर्वीप्रमाणेच संगणकीय प्रणालीवर आधारित कलचाचणी झाल्यास पालकांचा नाहक त्रास वाचेल.
-संजय सौंदलगे, पालक.
मोबाईलद्वारे कलचाचणी घेताना अॅण्ड्राईड मोबाईल, चार्जिंग आणि नेटवर्क नाही अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. काही शिक्षक, कर्मचाऱ्यांनी स्वत:चे मोबाईल देऊ सहकार्य करून कलचाचणी कशी-बशी पार पाडली. काही विद्यार्थी चाचणी सुरू असतानाच सेल्फी टिपत होते.
-आय. एम. गायकवाड,
मुख्याध्यापक, पन्हाळा.
कलमापन चाचणी घेताना विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास देणे कितपत योग्य आहे हा एक प्रश्न आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाढवायचे, कलमापन करायचे हा काय गोंधळ? त्यापेक्षा अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यात यावे.
-दत्ता पाटील,
सचिव, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ