हातकणंगलेत एकही गाव शेततळ्यास पात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 09:37 PM2016-03-25T21:37:35+5:302016-03-25T23:35:12+5:30
जाचक अटींचा परिणाम : योजना फसवी असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रया
दत्ता बीडकर -- हातकणंगले -शेततळ्यासाठी ५० पैसे पेक्षा कमी आणेवारीची अट शासनाने घातली आहे. ज्या गावांमध्ये मागील पाच वर्षांत टँकरने पाणीपुरवठा झाला आहे त्या गावांचा शेततळ्यामध्ये समावेश आणि ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली आहे त्यांना प्राधान्य अशा जाचक अटींमुळे हातकणंगले तालुक्यातील एकाही गावाचा समावेश शेततळ्यासाठी झाला नसल्याने शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना फसवी असल्याची संतप्त प्रतिक्रया तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांमध्ये यावर्र्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. पाऊस नसल्याने खरीप आणि रब्बी पीक हंगामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत आला आहे. ओढे विहिरी कोरड्या पडल्यामुळे यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कधी नव्हे ते यावर्षी प्रथमच पंचगंगा नदीवर पाणी उपसा बंदी लागू केल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. अशा स्थितीमध्ये शासनाने तालुक्याला टंचाई अंतर्गत एक रुपयाचा निधी दिला नसल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्याची अवस्था दयनीय झाली आहे.
शासनाने मागेल त्याला शेततळेची घोषणा केली आहे; मात्र याला तितक्याच जाचक अटी घातल्या आहेत. ज्या गावांची पीक आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. तसेच ज्या गावांमध्ये एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा शेतकऱ्याला शेततळे बांधण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा झाला आहे अशा गावांना प्राधान्य दिले आहे. वरील एकाही नियमामध्ये हातकणंगले तालुका बसत नसल्याने तालुक्यातील ६२ गावांमध्ये एकही शेततळे मंजूर झाले नाही. मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवणूक करणारी असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे.
हातकणंगले तालुक्यामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही एकाही गावाची पीक आणेवारी महसूल विभागाने ५० पैसे पेक्षा कमी केलेली नाही.
शासनाच्या कोणत्याही नियम व निकषाला तालुका पात्र ठरत नाही. शासनाने नुकतीच एक घोषणा केली आहे.
मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकरी वर्गाच्या डोळ्यांत धूळ फेक करणारी आहे.