पाणी नसल्याने ‘स्वाभिमानी’ने मध्य प्रदेशमध्ये रेल्वे रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:45 PM2018-11-29T23:45:39+5:302018-11-29T23:45:44+5:30
संतोष बामणे। लोकमत न्यूज नेटवर्क रतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये ...
संतोष बामणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्रीपासून पाणी, स्वच्छता व सुरक्षा नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. गुरुवारी सकाळी शौचालयासाठीही पाणी नसल्याने संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधील रतलाम जंक्शन येथे रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला.
महाराष्ट्रातून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वाभिमानीची विशेष रेल्वे मिरज येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. त्यांनतर पाच तास विलंब झाल्याने या रेल्वेत पुणे येथे पाणी भरले नाही. त्यानंतर कल्याण व सुरत येथे रात्री कर्मचारी नसल्याने पाणी भरले नाही. त्यामुळे पहाटेपासूनच रेल्वेत असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकºयांना पाण्यामुळे मोठी गैरसोय सोसावी लागली. सुरत रेल्वेस्थानकातही फक्त दोनच बोगीत पाणी भरल्याने अन्य
१५ बोगीत अडचण कायम राहिली.
अशा परिस्थितीत शेतकºयांना शौलाचालयाला जाण्यासाठीही सकाळी साडेनऊपर्यंत पाणी उपलब्ध न झाल्याने अखेर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रतलाम जंक्शनवर रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, राजेंद्र गड्याण्णावर व भगवान काटे यांनी प्रशासनाला जाब विचारला.
आंदोलन पाचवीलाच : राजू शेट्टी
स्वाभिमानी विशेष रेल्वे प्रासंगिक करार करून दिल्लीच्या आंदोलनाला रेल्वे नेत आहोत. त्यामुळे सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागला. आंदोलन केल्यानंतरच पाणी मिळाले असल्याने आमच्या पाचवीला आंदोलन पुजलेले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.