चुकीला माफी नाही : नुतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:24 PM2020-09-30T16:24:11+5:302020-09-30T16:25:24+5:30
पोलीस खात्यात अनावधानाने चूक झाल्यास दुर्लक्ष करु, पण जाणून बुजून चुक करणाऱ्याला कदापिही माफी नाही, असा इशारा नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. जिल्ह्यातील गेल्या अडीच वर्षातील चांगले काम टिकवून ठेवणार,त्यातूनही अवैद्य व्यावसायिकांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठेचून काढू असाही इशारा दिला.
कोल्हापूर : पोलीस खात्यात अनावधानाने चूक झाल्यास दुर्लक्ष करु, पण जाणून बुजून चुक करणाऱ्याला कदापिही माफी नाही, असा इशारा नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. जिल्ह्यातील गेल्या अडीच वर्षातील चांगले काम टिकवून ठेवणार,त्यातूनही अवैद्य व्यावसायिकांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठेचून काढू असाही इशारा दिला.
नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी बुधवारी सकाळी प्रभारी पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. लोकांचा पोलिसावरील विश्वास टिकला पाहिजे, त्यासाठी यंत्रणा सक्षम करणार, पोलिसांच्या कामात पारदर्शकता ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
ते म्हणाले, पोलीसांकडून सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. चुकीच्या पध्दतीने वागणाऱ्याला ठेचून काढू, मग ते पोलीस असो अगर अवैद्य व्यावसायिक. सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पोलीस ठाण्याच्या पातळीवर सोडविले जातील. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे कोणाचाही दबाव न घेता काम करतील, त्यासाठी आवश्यक ते पाटबळ देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणार आहे.
आर्थिक फसवणुकीचे, आॅनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले. यातील आरोपींना शोधणारे ज्ञान, कौशल्य पोलिसांना आत्मसात करावे लागणार आहे. अवैद्य व्यावसायिकांना ठेचून काढणार, कोणतेही गैरप्रकार जिल्ह्यात खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासनाचा कारभार लोकाभीमूख करण्यासाठी आवश्यक ते बदल करणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करु.
विश्वासाचा एक टप्पा पुढे राहू
गेल्या अडीच वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील सक्षम काम पुढेही विश्वासाने टिकवून ठेवू, कदाचित एक टप्पा पुढे राहू, असेही बलकवडे म्हणाले.
कोल्हापूरचे प्रेम
अडीच वर्षापूर्वी गडचिरोलीचा पदभार डॉ. अभिनव देशमुख यांच्याडून स्विकारला. आता पुन्हा कोल्हापूरचाही पदभार स्विकारला, हा योगायोग असून कोल्हापूरवरचे प्रेम असल्याचेही त्यांनी मिस्कीलपणे सांगितले.