कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

By विश्वास पाटील | Published: October 19, 2023 08:31 AM2023-10-19T08:31:38+5:302023-10-19T08:33:38+5:30

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा तयारीची बैठक

Nominate V. B. Patil from Kolhapur and Prateek Patil from Hatkanangale Demand of NCP workers | कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व हातकणंगले मतदार संघातून प्रतीक पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केली. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात ही बैठक झाली. त्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख आदी नेते उपस्थित होते. या दोन्ही जागांवर पक्षाला चांगले वातावरण असल्याचे सर्वेक्षणाचे अहवाल असून उमेदवार कोण द्यायचे याचा निर्णय खासदार पवार हेच घेतील, असे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर लोकसभेचा आढावा घेताना तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष व इतर मान्यवरांनी भूमिका मांडली. लोकसभेसाठी पक्षाला पोषक वातावरण आहे. पवार यांना मानणारा ज्येष्ठांसह युवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे कोल्हापूर व हातकणंगलेसाठी राष्ट्रवादीचेच उमेदवार असावेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर व्ही. बी. पाटील यांनी पक्षाची उत्तम बांधणी केली. महाविकास आघाडीला जागा वाटप होणार असल्याने विधानसभेला पक्षाला कमी जागा मिळतील. आता पक्षाकडे जिल्ह्यात साखर कारखाने व अन्य कोणतीही सत्ता नाही. त्यामुळे लोकसभेला संधी मिळाली तर त्यामुळे पक्षाला उभारी येऊ शकेल. व्ही. बी. पाटील यांचे राजकारणाव्यतिरिक्त अनेक संस्था, संघटनांशी चांगले संबंध आहेत. जिल्हास्तरावर ते सर्वांना परिचित असून त्यांचे आघाडीतील काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना या मित्र पक्षाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा होऊ शकेल अशी मांडणी करण्यात आली.

बैठकीस शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, अनिल घाटगे, सुनील देसाई, नितीन भाऊ पाटील, गणेश जाधव, नितीन जांभळे, मदन कारंडे, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, गडहिंग्लजचे अमर चव्हाण, शिवाजी खोत, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, पंडित कळके, राजाराम कासार, गगनबावडा अध्यक्ष प्रकाश पाटील, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अभिजित पवार, तानाजी आलासे, संदीप बिरणगे आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी यांच्यासाठी मतदार संघ सोडू नये -
हातकणंगले मतदार संघासाठी देखील सांगलीच्या दोन्ही तालुक्यासह कोल्हापूरच्या चारही तालुक्याच्या शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व इतर मान्यवर या सर्वांनी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नावाला पसंती दर्शविली. हा मतदार संघ माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

नितीन जांभळे इचलकरंजीचे शहराध्यक्ष -
बैठकीत कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी अनिल घाटगे व इचलकरंजी कार्याध्यक्षपदी रावसाहेब भिलवडे यांची तर इचलकरंजी शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नितीन जांभळे यांना नियुक्तीची पत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
 

Web Title: Nominate V. B. Patil from Kolhapur and Prateek Patil from Hatkanangale Demand of NCP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.