‘अॅश’ शॉर्ट फिल्मला नामांकन
By admin | Published: April 21, 2016 12:39 AM2016-04-21T00:39:54+5:302016-04-21T00:39:54+5:30
दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव : सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : दिल्लीमध्ये ३० एप्रिलला दादासाहेब फाळके (भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक) यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये आपल्या कोल्हापूरमधील ‘अॅश’ या शॉर्ट फिल्मला नामांकन मिळाले आहे. या महोत्सवामध्ये अमेरिका, आॅस्ट्रेलिया, इटली, स्पेन, जपान, जर्मनी, इराण, लंडन, रशिया, फान्स, मेक्सिको अशा जगभरातून जवळजवळ ९०० फिल्मस् शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या. त्यामधून ‘अॅश’ या शॉर्ट फिल्मने पुणे, औरंगाबाद, बीड, मुंबई, दिल्ली, गोवा येथे अनेक नामांकने मिळवलेली आहेत. तसेच विदेशामध्येही अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी दाखल झाली आहे. ‘अॅश’ या शॉर्ट फिल्मची संकल्पना -निर्माता - दिग्दर्शक उदय राजाराम पाटील यांची आहे. या फिल्मविषयी बोलताना उदय राजाराम पाटील म्हणाले, ही शॉर्ट फिल्म ‘चेन स्मोकर’वर बेतलेली कथा आहे. आपण आपल्या आजूबाजूला, सार्वजनिक ठिकाणी आपण पाहतो, आजची तरुण पिढी बिनधास्त सिगारेट ओढत असतात. त्यांच्या आजूबाजूला ‘नो स्मोकिंग’चे फलक लावलेले असतानादेखील किंवा सिगारेट पाकिटावर देखील लिहिलेले असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि भविष्यात त्यांना कॅन्सर, हार्ट अटॅक, अशा रोगांना सामोरे जावे लागते आणि अगदी जिवावर बेतल्यावर सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतात; पण त्यावेळी कदाचित ती वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच या शॉर्ट फिल्ममधून दिग्दर्शकाने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सिगारेट ओढणाऱ्यांनो, आजच सावध होऊन सिगारेट सोडा. विषाची परीक्षा पाहू नका. या शॉर्ट फिल्ममध्ये एकही कलाकार किंवा संवाद नसून दृश्यांच्या माध्यमातून ही कलाकृती साकारली आहे. या शॉर्ट फिल्मचे सहनिर्माते-असोसिएट दिग्दर्शक अशोक बापू कांबळे आहेत. छायांकन - विलास चौगुले, संकलन - सलोनी कुलकर्णी, पार्श्वसंगीत - रवी सुतार यांचे आहे. या शॉर्ट फिल्मसाठी प्रदीप राठोड सेठ, अरुणकुमार भोसले (सरकार), सचिन सुग्रीव जाधव, विलास पाटील, वैभव जकाते यांचे सहकार्य लाभले. भविष्यात सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर आणखी लघुपट बनविणार आहे. यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा आपला प्रयत्न राहील.