‘इमेगो’ची मामी, इफ्फीसाठी निवड, आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटीसाठीही नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:26 AM2018-10-24T11:26:07+5:302018-10-24T11:27:36+5:30
कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, विक्रम पाटील, ऐश्वर्या घायदार, विकास दिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, विक्रम पाटील, ऐश्वर्या घायदार, विकास दिगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दळवीज आर्टस् इन्स्टिट्यूट, कलानिकेतन संस्थेमध्ये कलाशिक्षण घेत असताना त्यांनी ‘अलोन’, ‘दगडफूल’, ‘पोल्युट’ अशा लघुपटांतून आपल्या संवेदनशील कलाकृतींची चुणूक दाखवली होती. दरम्यान, त्यांना ‘इमेगो’ चित्रपटाची संकल्पना सुचली. कोड किंवा अंगावर पांढरे डाग असलेल्या व्यक्तींच्या जीवनानुभावर हा चित्रपट बेतला आहे.
ऐश्वर्या घायदार यात मुख्य भूमिकेत असून तिने स्वत: हा संघर्ष सोसला आहे. त्यामुळेच अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही तिने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. तब्बल चार वर्षांच्या परिश्रमानंतर हा चित्रपट विविध महोत्सवांत झळकत आहे.
वेगळ्या धाटणीतला चित्रपट असला तरी त्यासाठी निर्माता मिळत नव्हता अखेर राजेंद्र यादव तयार झाले. आता मला या चित्रपटाचा निर्माता असल्याचा अभिमान आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. गीतांची जबाबदारी सरिका पाटीलने सांभाळली असून अनिकेत मंगळूरकर यांनी संगीत दिले आहे. यावेळी मयूर कुलकर्णी यांनी डिझाईन केलेल्या पोस्टरचे यावेळी अनावरण झाले. परिषदेस ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, डॉ. अनमोल कोठाडिया, रावसाहेब चिकलवाले आदी उपस्थित होते.