विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा
By admin | Published: November 4, 2014 12:35 AM2014-11-04T00:35:15+5:302014-11-04T00:44:22+5:30
कुलगुरू निवड प्रक्रिया : राजभवनाने पाठविले शिवाजी विद्यापीठाला पत्र
कोल्हापूर : कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठ प्रतिनिधीचे नामनिर्देशन करा, अशा आदेश शिवाजी विद्यापीठाला राजभवनातून दिला आहे. याबाबतचे पत्र विद्यापीठाला आज, सोमवारी प्राप्त झाले आहे. या पत्रामुळे कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.
विद्यमान कुलगुरू डॉ. पवार यांची मुदत दि. २५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्याच्या सहा महिने आधी नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होणे व्हावे, असे संकेत आहेत. मात्र, त्याबाबत निवडणुका, आचारसंहिता आदींमुळे काहीच हालचाली झाल्या नव्हत्या; पण कुलगुरू डॉ. पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच आपली विद्यापीठातील मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार असल्याचे कुलपती कार्यालयाला कळविले होते. त्यावर दि. ३१ आॅक्टोबरला राजभवनातून कुलगुरू निवडीसाठीच्या समितीसाठी विद्यापीठ प्रतिनिधींचे नामनिर्देशन करा, या आदेशाचे पत्र पाठविले.
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला हे पत्र आज मिळाले. त्यानुसार प्रतिनिधींचे नामनिर्देशन करण्यासाठी २० नोव्हेंबरला विद्यापीठात बैठक होणार आहे.
विद्यापीठाच्या सभा व निवडणुका विभागातर्फे ही बैठक घेतली जाणार आहे. राजभवनातून आलेल्या पत्रामुळे कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालीदेखील आता गतीमान होणार आहेत. (प्रतिनिधी)
आता शोध नाही, निवड...
विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेसाठी २००९ मध्ये नेमलेल्या समितीचे नाव ‘कुलगुरू शोध समिती’ असे होते. मात्र, यावेळी त्यात बदल केला असून, ‘कुलगुरू निवड समिती’ असे राहणार आहे. ही समिती त्रिसदस्यीय आहे. त्यात कुलपती नियुक्त, उच्च व तंत्रशिक्षण विभाग नियुक्त आणि स्थानिक विद्यापीठातील एक असे प्रतिनिधी असणार आहेत.