‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलन व्यापारी-उद्योजकांचा निर्णय
By Admin | Published: May 15, 2014 01:01 AM2014-05-15T01:01:28+5:302014-05-15T01:03:01+5:30
कोल्हापूर : ‘एलबीटी’ विरोधी व्यापार्यांनी तीव्र लढा उभा केला आहे. त्यातच आज, बुधवारी ‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलनाचा निर्णय झाला.
कोल्हापूर : ‘एलबीटी’ विरोधी व्यापार्यांनी तीव्र लढा उभा केला आहे. त्यातच आज, बुधवारी ‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलनाचा निर्णय झाला. याची आजपासूनच (बुधवार) अंमलबजावणी सुरू झाली आहे. व्यापारी मित्र संघटनेतर्फे पुणे मर्चंट चेंबर येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी ‘फाम’ संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरनानी होते. बैठकीला राज्यातील २६ पैकी १८ महापालिका क्षेत्रातील व्यापारी व उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर प्रतिनिधींनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. बैठकीत यापूर्वीच्या आंदोलनाचा आढावा घेण्यात येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. सर्व व्यापार्यांनी ‘एलबीटी’विरोधी तीव्र भूमिका कायम ठेवावी व ‘फाम’ संघटनेच्या आदेशानुसार पुढील आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. याचाच एक भाग म्हणून आजपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. याला उपस्थित प्रतिनिधींशिवाय अनुपस्थित महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजकांनीही सहमती दर्शविली आहे. त्यानुसार महिन्याला फक्त १० रुपये इतकी ‘एलबीटी’ भरण्याचे ठरले. याबाबतीत सर्व व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती अभियान राबविण्याचे ठरले. सांगली येथे येत्या आठ दिवसांत पुढील बैठक होणार आहे. बैठकीला खासदार गजानन बाबर, प्रदीप कापडिया, अमर क्षीरसागर, संजय रामचंदानी, हर्षद शहा, प्रफुल्ल संचेती, राजू राठी, अजित कोठारी, अजित मेहता, विक्रम निसार, सुरेश जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)