अशासकीय मंडळ जाणार !
By admin | Published: November 3, 2014 11:40 PM2014-11-03T23:40:17+5:302014-11-04T00:24:43+5:30
बाजार समितीचा ‘बाजार’ : मंडळाविरोधातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या अशासकीय मंडळाचा फैसला चार दिवसांत होणार आहे. याबाबत कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी, (दि. ७) सुनावणी होणार आहे. ‘नेर’ बाजार समितीबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकाल पाहता नेमलेल्या अशासकीय मंडळाचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
पणन संचालकांनी ७ आॅगस्ट २०१४ ला बाजार समितीचे प्रशासक डॉ. महेश कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली. राजकीय मंडळींनी निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी अशासकीय मंडळ आणले, पण त्याला जनतेतूनच जोरदार विरोध झाला. कोल्हापूर बाजार समितीसाठी १५ जणांचे जम्बो मंडळ अस्तित्वात आले. त्यानंतर अशासकीय मंडळाची शेपूट दिवसेंदिवस वाढत जात १९ पर्यंत पोहोचली. त्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झाले. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार व भीमराव पाटील यांनी पणन संचालक यांच्याकडे अशासकीय मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी केली. तोपर्यंत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागल्याने गेले दीड महिने या प्रक्रियेत गेले. परिणामी यावरील सुनावणी होऊ शकली नाही. ‘मॅट’चा निकाल व त्यानंतर न्यायालयीन लढाई लढत डॉ. माने हे पणन संचालक म्हणून पुन्हा कार्यरत झाले. पोवार व भीमराव पाटील यांच्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मुळात डॉ. माने यांचा अशा प्रकारच्या अशासकीय मंडळ नियुक्तीला विरोध आहे. त्यामुळे ते या मंडळाला झटका देण्याची शक्यता दाट आहे.
त्यात अशासकीय मंडळाविरोधात बाजार समितीचे माजी सभापती बाबगोंड पाटील यांची देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. ‘नेर’ बाजार समिती मधील अशासकीय मंडळाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाची प्रत बाबगोंड पाटील यांनी याचिकेसोबत जोडल्याने अशासकीय मंडळाच्या डोक्यावर बरखास्तीची टांगती तलवार कायम आहे. याची सुनावणी ११ नोव्हेंबरला आहे.( प्रतिनिधी)
रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत नरमाई..
न्यायालयाने रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही अशासकीय मंडळाने कारवाई केलेली नाही. याविरोधात गेले महिनाभर याचिकाकर्ते अवमान याचिका दाखल करण्याची नुसती भाषाच करत असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल करू नये, यासाठी तडजोडी सुरू झाल्या असून, जिल्ह्यातील बड्या राजकीय मंडळींनी यात लक्ष घातल्याने याचिकाकर्तेही नरमल्याचे समजते.
कोल्हापूर बाजार समितीच्या अशासकीय मंडळाबाबत आपल्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्याची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.
-डॉ. सुभाष माने, (पणन संचालक,पुणे)