कोल्हापूरात अहिंसा ज्योत व शांतता रॅली
By Admin | Published: April 8, 2017 05:57 PM2017-04-08T17:57:18+5:302017-04-08T17:58:45+5:30
भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : भगवान महावीरांचा अहिंसा, जगा व जगू द्या, शांतता असा संदेश देण्यासाठी भगवान महावीर प्रतिष्ठान, समस्त जैन समाज यांच्यावतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी ‘अहिंसा ज्योत व शांतता रॅली’ शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. महावीर गार्डन येथून अहिंसा रॅलीस सुरुवात झाली.
‘महावीर भगवान की जय,’ ‘जैन धर्म की जय’ यासह विविध धार्मिक घोषणा देत महिलासुद्धा यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. ही ज्योत रॅली दाभोळकर कॉर्नर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ मंदिर येथे येऊन विसर्जित झाली. रॅलीमध्ये रुईकर कॉलनी, शाहूपुरी, शुक्रवार पेठ, आर. के. नगर येथील सर्व महिला गुलाबी, पिवळे, फेटे बांधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.युवा मंच ग्रुप सायकलवरून या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.
रॅलीचे नियोजन जैन सेवा संघासह केले होते. याप्रसंगी अध्यक्ष भरत सांगरूळकर, सचिव सुरेश मगदूम, आनंद पाटणे, सुनील डुणूंग, भरत वणकुद्रे, अजय कोले, मनोहर मोळे, महावीर साबळे, विद्यासागर चौगुले यांच्यासह विविध जैन संघटनांसह समाजातील श्रावक- श्राविका बहुसंख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
विविध स्पर्धा भगवान महावीर प्रतिष्ठान व महावीर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर महाविद्यालयात लहान व मोठ्या गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लहान गटात ३०, तर मोठ्या गटात ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. रात्री आठ वाजता गंगावेश येथील मानस्तंभ जिनमंदिर येथे आदिनाथ कलामंच प्रस्तुत ‘श्री महावीर तिप्पन्नावर यांच्या जैन भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला