सामान्य क्लासेस चालकांवरील जाचक अटींविरोधात वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 04:28 PM2017-12-24T16:28:00+5:302017-12-24T16:28:02+5:30
कोल्हापूर - राज्य सरकार जो नवीन क्लासेस नियंत्रण कायदा आणू इच्छिते तो अत्यंत जाचक आहे. त्याच्या कच्च्या मसुद्यावरुन ते स्पष्ट झाले आहे. त्यातील अटींमुळे सामान्य क्लासेस चालकांना काम करणे अवघड होणार आहे. त्यांचा व्यवसाय उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे सरकारने या जाचक अटी रद्द कराव्यात. याअनुषंगाने कार्यवाही न झाल्यास वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात खाजगी क्लासेस चालक रस्त्यावर उतरतील, असे कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनचे (केप्टा) अध्यक्ष प्रा. बी. एस. पाटील आणि सदस्य प्रा. तानाजी चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रा. पाटील म्हणाले, या कायद्याच्या कच्चा मसुद्यातील जाचक अटींबाबतच्या दुरुस्ती सुचविणे आणि यावरील पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यासाठी क्लासेस चालकांची लातूर येथे बुधवारी (दि. २०) प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या आमच्या राज्यस्तरीय संघटनेची बैठक झाली. खासगी शिकवणी अधिनियमन समितीवर आमच्या राज्य असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही जाचक अटींबाबत काही दुरुस्ती सुचविल्या आहेत. त्याचा विचार सरकारने करुन सकारात्मक कार्यवाही करावी. अन्यथा सरकारच्या अशा स्वरुपातील नियंत्रणाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. प्रा. चव्हाण म्हणाले, पुरातन काळापासून चालत आलेल्या या क्लासेस व्यवसायाला सध्याच्या सरकारच्या नियंत्रणाचा निर्णय आणि जाचक अटींमुळे ग्रहण लागणार आहे. त्यामुळेच या जाचक अटींना आम्ही विरोध करीत आहोत. जाचक अटींऐवजी अनुदान, सरकारी कोट्यातून जागा देणे अशा पद्धतीने सरकारने आम्हाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खजिनदार संजय यादव म्हणाले, दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम आम्ही करतो. ते लक्षात घेऊन सरकारने नियंत्रणाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. मोहन गावडे, माजी राज्यध्यक्ष सुभाष देसाई, ‘केप्टा’चे उपाध्यक्ष दिपक खोत, सचिव संजय वराळे, सदस्य शहाजी पाटील, आदी उपस्थित होते.
आम्ही केलेल्या मागण्या
जाचक अटी रद्द कराव्यात. क्लासेसची वर्गवारी करावी. संबंधित कायदा मागे घ्यावा. तीनशेपर्यंत विद्यार्थी संख्या असलेले क्लासेस यातून वगळावेत, आदी स्वरुपातील आमच्या मागण्या आहेत, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, लातूरमध्ये झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी आम्ही रविवारी जिल्ह्यातील क्लासेसचालकांचा मेळावा घेतला. आम्ही सुचविलेल्या दुरुस्ती आणि केलेल्या मागण्यांबाबत खासगी शिकवणी अधिनियमन समितीच्या आगामी होणाºया बैठकीत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.
जिल्ह्यात ६० हजार जणांना रोजगार
कोल्हापूर जिल्ह्यात १५०० खाजगी क्लासेस आहेत. त्याठिकाणी दरवर्षी शिक्षण घेणारे विद्यार्थी सुमारे ५० हजार, तर या क्लासेसच्या माध्यमातून साधारणत: ६० हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.