कोल्हापुरातील संगीतप्रेमींनी अनुभवले नौशाद-संगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:59 AM2018-12-27T11:59:43+5:302018-12-27T12:01:02+5:30
कोल्हापूर येथील स्मृतिगंध लिसनर्स क्लबच्या चौऱ्याऐंशीव्या कार्यक्रमात कोल्हापुरातील रसिक संगीतप्रेमींनी नौशाद संगीत अनुभवले. संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमांत श्रोत्यांना त्यांच्या काही निवडक गाण्यांची मेजवानी मिळाली.
कोल्हापूर : येथील स्मृतिगंध लिसनर्स क्लबच्या चौऱ्याऐंशीव्या कार्यक्रमात कोल्हापुरातील रसिक संगीतप्रेमींनी नौशाद संगीत अनुभवले. संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमांत श्रोत्यांना त्यांच्या काही निवडक गाण्यांची मेजवानी मिळाली.
स्मृतिगंध लिसनर्स क्लब सातत्याने स्थापनेपासून वेगवेगळ्या सांगीतिक मेजवानीचे आयोजन करीत आले आहे. यंदा संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने येथील खरे मंगल कार्यालयात नौशाद संगीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
ध्वनिमुद्रिकांवर आधारित या रसग्रहणात्मक कार्यक्रमात नौशाद यांच्या गाजलेल्या रतन, दर्द, दिल्लगी, बैजू बावरा यांसारख्या जुन्या चित्रपटांतील मधुर गीते श्रोत्यांना ऐकायला मिळाली. मुगल-ए-आझम, मदर इंडिया यांसारख्या मधल्या काळातील गीतांच्या समृद्ध संगीतांनी तर श्रोते मोहून गेले.
प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर, प्रभाकर तांबट आणि धनंजय कुरणे या संयोजकांनी मार्मिक आणि रसाळ निवेदन करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली. मध्यांतरापूर्वी सादर केलेली नौशाद-संगीताची रागमाला त्या संगीताचा दर्जाच वाढविणारी होती.
कार्यक्रमाचा शेवट शहाजहाँ या चित्रपटातील सैगल यांनी गायिलेल्या गाण्याने झाला. त्यानंतर लावलेल्या दास्तांन या चित्रपटातील नागनृत्यसंगीताने श्रोते भावविभोर झाले.