प्रशासकीय इमारत नव्हे अस्वच्छतेचे आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:05+5:302021-02-27T04:30:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन मोठ्या आशेने येतात ते कसबा बावडा रस्त्यावरील मध्यवर्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन मोठ्या आशेने येतात ते कसबा बावडा रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतच सध्या अस्वच्छता, दुर्गंधी, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, स्वच्छतागृहांची गैरसोय आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा दुरावस्थेच्या गर्देत आहे. दिवसा या अस्व्छतेने कर्मचारी-नागरिकांचा श्वास गुदमरतो, तर रात्री तिथे तळीरामांचा अड्डा होतो. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, शेजारचे पोलीस मुख्यालयाच्या तुलनेत ही इमारत म्हणजे शासकीय कार्यालयाचे नाक कापण्यासारखी स्थिती आहे.
या इमारतीत २३ च्यावर शासकीय कार्यालये असून, दिवसभर विविध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिकांची मोठी वर्दळ असते, पण येथील कर्मचारीच इतक्या गैरसोयीच्या ठिकाणी आठ ते दहा तास काम करतात की त्यांच्यासह सर्वसामान्यांच्या सहनशीलतेला सलामच करावासा वाटतो. प्रवेशद्वारातच भला मोठ्ठा खड्डा चुकवून आत गेलो की डावीकडे स्क्रॅपमधील वाहने कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करतात. इमारतीच्या भोवतीने इतक्या बेशिस्तीने वाहने लावली जातात की तीन-चार चकरा मारल्यानंतर पार्किंगसाठी जागा मिळते.
पान खावून थुंकणाऱ्यांनी इमारतीची एकही जागा आपल्या या कलाकुसरीने रंगवण्याची शिल्लक सोडलेली नाही. त्याला प्रवेशद्वारापासूनचे सगळे कोपरे तीनही मजल्यांवरील भिंती स्वच्छतागृहही अपवाद नाही. बाहेर पाला-पाचोळ्याचे ढीग, खिडक्यांच्या काचा, दारे, पाइप या वस्तूंचे ओंगळवाणे प्रदर्शन यात भरच टाकते.
----
धूळ, कचरा..तरीही स्वच्छच
आत प्रवेश केला कार्यालये सोडली तर पॅसेजमध्ये सर्वत्र धूळ, कचरा, कागदाचे कपटे पडलेले दिसतात..हा परिसर शुक्रवारी स्वच्छ होता असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते कारण संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त त्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्वच्छता अभियान राबवले होते. कर्मचारी आपापले कार्यालय स्वच्छ करतात. पण इमारत व परिसराची स्वच्छता कोण करणार?
-------------
कॅन्टीन, पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहे बंद
येथे परगावचे नागरिक कामानिमित्त मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना खाद्यपदार्थ मिळण्यासाठी चांगले कॅन्टीन नाही. सर्वसामान्य लोक सोडाच कर्मचाऱ्यांनाही पिण्यासाठी पाणी नाही, सगळे घरातूनच पाणी आणतात. वॉटर फिल्टरची तर न बघण्यासारखी स्थिती होती. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने प्रचंड दुर्गंधी असते.. त्यात महिलांची तर फारच अडचण होते. सर्वसामान्यांसाठी मागच्या बाजूला नुसतेच बांधलेले स्वच्छतागृह बंद आहे, कारण पाणी नाही.
----------------
तळिरामांचा अड्डा
कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला त्यावेळी तीन पोती दारुच्या बाटल्या येथून निघाल्या. एवढ्या महत्वाच्या इमारतीतील दस्तऐवज, कामकाजाच्या सुरक्षेसाठी येथे सुरक्षा यंत्रणा, वॉचमन नाही. सायंकाळनंतर येथे तळिरामांचा अड्डा जमतो. कोणीही या काहीही करुन जा. अनेकजण न्यायालयातील कामासाठी येतात आणि इथे गाड्या लावून जातात.
---
एजन्सी नियुक्त करावी
या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीशांपासून ते सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनीदेखील वारंवार तक्रारी केल्यानंतर, पत्र दिल्यानंतरही विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही. अन्य शासकीय कार्यालयांप्रमाणे येथे स्वच्छता, सुरक्षेसाठी एजन्सीची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
----
कार्यालये
औद्योगिक न्यायालय, भूजल सव्हेक्षण व विकास, जिल्हा माहिती कार्यालय, अर्बन लँड सेलींग, जिल्हा पूर्नवसन, संजय गांधी योजना, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधीकरण, आरोग्य उपसंचालक, सहाय्यक जिल्हा निबंधक, अन्न धान्य वितरण, महिला व बालकल्याण, सहकार न्यायालय क्रमांक १ व २, कामगार न्यायालय, अपर उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, माहिती उपसंचालक विभागीय कार्यालय, सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग२,३,४), आण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळ, सहाय्यक संचालक नगररचना, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता, जिल्हा प्राहक तक्रार निवारण मंच.
---
इमारतीतील गैरसोयींबद्दल आम्ही सर्व विभागांनी सार्वजनिक बांधकामकडे वारंवार तक्रार केली आहे. इतक्या महत्वाच्या इमारतीत पिण्याचे पाणि नाही, अस्वच्छता, स्वच्छतागृहांची गैैरसोय, पार्कीग, सुरक्षा अशा मुलभूत सुविधाही नाहीत. विभागाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देवून तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा आहे.
प्रशांत सातपूते
जिल्हा माहिती अधिकारी
--
फोटो फाईल स्वतंत्र
०००