भीक नाही, जेवण देणार... - दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:24 PM2019-02-04T23:24:59+5:302019-02-04T23:26:41+5:30
- चंद्रकांत कित्तुरे परवा एक बातमी वाचनात आली. स्वत:च्या मुलाने आपल्या वृद्ध आईला सांगलीतील अहिल्यानगर नावाच्या उपनगरात आणून सोडले ...
- चंद्रकांत कित्तुरे
परवा एक बातमी वाचनात आली. स्वत:च्या मुलाने आपल्या वृद्ध आईला सांगलीतील अहिल्यानगर नावाच्या उपनगरात आणून सोडले आणि तिला काही न सांगता तेथून तो गायब झाला. सुमारे ८० वर्षांची वृद्ध आई. कुठे राहील, काय खाईल याचा कसलाही विचार न करता बेवारस स्थितीत सोडून जाताना त्याला काहीच वाटले नसेल का? जिने आपल्याला पोटात नऊ महिने सांभाळून अंगाखाद्यांवर खेळविले, लहानाचे मोठे केले, संस्कार दिले, संसाराला लावले तिच्याबद्दल त्याच्यात इतकी निष्ठूरता का आली असेल? आई आणि मुलाचे नाते इतके पातळ आहे का? यासारखे अनेक प्रश्न ती बातमी वाचून मनात उभे राहिले. कडाक्याच्या थंडीत तीन दिवस त्या वृद्ध मातेने तेथे रस्त्याकडेलाच दिवस काढले.
म्हातारी एकटीच रस्त्यावर दिवस-रात्र दिसतेय हे तेथील रहिवाशांच्या लक्षात आल्यावर काहींनी तिला खायला दिले. तिची विचारपूस करून एका आधार आश्रमात तिला नेऊन सोडले. किमान राहण्याची तरी तिची सोय झाली. मात्र तेथे राहताना, पोटच्या मुलाने असे सोडून दिल्यानंतर त्या म्हातारीची अवस्था काय झाली असेल. तीन दिवस रस्त्यावर मागून खाताना तिच्या मनाला काय यातना झाल्या असतील याची कल्पनाच न केलेली बरी.
याचवेळी व्हॉटस्अॅपवर एक मेसेज फिरत होता. आम्ही भिकाऱ्यांना अन्न-पाणी देऊ; पण पैसे देणार नाही, अशी एक वेगळी चळवळ मुंबईत सुरू झाली आहे. मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असोत. सर्वा$ंनाच या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही या मेसेजमध्ये करण्यात आले होते. वाटले भीक कुणी स्वेच्छेने मागते का? भिकारी कोण तयार करतो? अंध, अपंग किंवा वृद्ध स्त्री-पुरुष अथवा लहान मुले भीक मागताना आपल्याला दिसतात. असाहाय्यता म्हणून ती भीक मागत असतात असे कुणीही म्हणेल. वरील म्हातारीचे उदाहरण पाहिले तर ते पटेलही.
आपल्याला रस्त्यावर, बसस्थानक, रेल्वेस्थानकावर भिकारी भीक मागताना दिसतात. असाहाय्य अंध, अपंग, वृद्धांबरोबरच अनेक तरुण स्त्रियांही काखेत लहान मूल बांधून भीक मागत असतात. अशा लोकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ही चळवळ करते आहे. या लोकांना जेवायला अन्न, प्यायला पाणी द्यायचे. श्रम करू शकणाºयांना शक्य त्या ठिकाणी काम मिळवून द्यावयाचे आणि स्वबळावर जगायला शिकवायचे, अशी या चळवळीची भूमिका आहे.
आपणही आपल्या परीने या चळवळीत सहभागी होऊ शकतो. भीक मागणाºयाला तुला पैशाच्या स्वरूपात भीक देणार नाही. हवे तर तुला जेवू घालतो असे त्याला म्हणू शकतो. त्याची विचारपूस करून त्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी कुठे काम देता येईल का? यावर विचार करू शकतो.
भारतात भीक मागणे कायद्याने गुन्हा असला तरी देशात सुमारे पाच लाख भिकारी असल्याचे सांगितले जाते. भिकाºयांचेही दोन प्रकार आहेत. कामधंदा करता येत नाही. सांभाळणारे कुणी नाहीत म्हणून भीक मागणारे आणि व्यवसाय म्हणून भीक मागणारे.
भीक मागून श्रीमंत होणाºयांचे किस्सेही अधूनमधून वाचायला ऐकायला मिळतात. त्यामुळे काहीही काम न करता श्रीमंत होण्याचा किंवा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग म्हणूनही काहीजण हा व्यवसाय पत्करतात. यातूनच लहान मुलांचे अपहरण करून त्यांना या मार्गाला लावणारे महाभागही मोठ्या संख्येने आहेत.
एका आकडेवारीनुसार दरवर्षी भारतात सुमारे ४० हजार बालकांचे अपहरण केले जाते. यातील सुमारे १० हजार मुलांचा ठावठिकाणा लागत नाही. लहान मुलांचे अपहरण करून त्याचा वापर भीक मागण्यासाठी करणाºया महिलाही कमी नाहीत. महाराष्ट्रातील गाजलेले अंजनाबाई गावित हिचे बालके हत्याकांड प्रकरण हे याच प्रवृत्तीचे फलित होते. महाराष्ट्रात सुमारे ७० हजार भिकारी आहेत. या सर्व भिकाºयांचे पुनर्वसन करणे व त्यांच्या हाताला काम देण्याची योजना महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी जाहीर केली होती.
मात्र, ती कितपत यशस्वी झाली की, कागदावरच राहिली हे समजायला मार्ग नाही. कारण रस्त्यावर भीक मागणाºयांची संख्या कमी झाली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे केवळ सरकार काही करेल या आशेवर न थांबता समाजाने भीक न देता भिकाºयांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यायला हवा तरच महाराष्ट्र भिकारीमुक्त होऊ शकेल.