बौद्धिक अक्षम मुलांसाठी अभ्यासक्रमच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:51 AM2018-07-30T00:51:38+5:302018-07-30T00:51:42+5:30

Not a curriculum for children with intellectual disabilities ... | बौद्धिक अक्षम मुलांसाठी अभ्यासक्रमच नाही...

बौद्धिक अक्षम मुलांसाठी अभ्यासक्रमच नाही...

Next
<p>इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या बौद्धिक अक्षम (मतिमंद) मुलांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण दिले जावे, याबद्दल राज्य शासनाने अभ्यासक्रम ठरविलेला नाही. त्यामुळे शाळांनी ‘एमडीपीएस’ आणि ‘एनआयपीआयडी’ने जवळपास २५ वर्षांपूर्वी दाखविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि निकषांचा आधार घेऊन स्वतंत्रपणे अभ्यासक्रम ठरविला आहे; तर अनेक शाळा अभ्यासक्रम नसल्याचा फायदा घेत केवळ अनुदान लाटण्यासाठी चालविल्या जात आहेत.
या विशेष मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे एका ढाच्यात बसवलेला पुस्तकी अभ्यासक्रम चालत नाही. स्वत:ची कामे स्वत: करण्यापासून ते वैयक्तिक स्वच्छता, बोलणं, वागण्याचं भान, नीटनेटकेपणा, कुटुंबीयांना कामात मदत, भोवतालचा परिसर, पशू, पक्षी, प्राणी यांचे सामान्य ज्ञान, मतिमंदत्वाचे प्रमाण कमी असेल तर लिहा-वाचायला शिकविणे, सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जाण्यायोग्य त्याची बौद्धिक क्षमता वाढविणे, शिक्षणात फारसा रस नसेल तर कलाकौशल्य, लघुउद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे या गोष्टी मतिमंद मुलांना शिकवाव्या लागतात.
अभ्यासक्रमाचे नियम या विद्यार्थ्यांना लागू नसले तरी त्यांना कोणत्या वयात काय आले पाहिजे, कोणत्या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे, सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी बौद्धिक पातळी कशी वाढविता येईल याबाबतचे कोणतेही निर्देश किंवा अभ्यासक्रम राज्य शासनाने निश्चित केलेला नाही. त्यामुळे या मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळा त्यांचा-त्यांचा अभ्यासक्रम ठरवितात. त्यासाठी एमडीपीएस (मद्रास डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सिस्टीम) आणि एनआयपीआयडी (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द जीेदलो इंटेलेक्च्युअल डिसएबल) या दोन संस्थांनी मांडलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांचा आधार घेतात. चेतना विकास मंदिर, स्वयम् विशेष मुलांची शाळा, जिज्ञासा या शाळांनी या तत्त्वांचा वापर करून मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार अभ्यासक्रम ठरविला आहे. त्याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. शिवाय कार्यकेंद्रित म्हणजेच अर्थार्जनाच्या दृष्टीने त्यांना लघुउद्योगांचे ज्ञान दिले जाते; पण हे कोणतेच अभ्यासक्रम शासनप्रमाणित नाहीत.
अभ्यासक्रम ठरविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी शासनाकडून विशेष समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली; पण नंतर ती हवेतच विरली. अभ्यासक्रम नसल्याचा फायदा घेऊन काही शाळा या केवळ अनुदान लाटण्यासाठीच सुरू असल्याचे चित्र आहे. यात ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण जास्त आहे.
फिट आली की नव्याने सुरुवात...
या विद्यार्थ्यांसाठी काही औषधोपचार असतात. काहीजणांना बहुविकलांगित्व आलेले असते. अनेक विद्यार्थ्यांना फिट येत असतात. त्यामुळे शाळेत आल्यानंतर त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. अनेकदा ही मुलं खूप हायपर होतात. विचित्र वागू लागतात, अशावेळी त्यांना सावरणं आणि त्या स्थितीतून बाहेर काढणं ही पालकांची आणि शिक्षकांचीही कसोटीच असते. एकदा फिट आली की विद्यार्थ्याला आजवर शिकविलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, सवयी, माहिती त्यांच्या मेंदूतून पार पुसून जातात, पुन्हा नव्याने सगळं शिकवावं लागतं.
बौद्धिक अक्षम मुलांसाठी शासनाने अभ्यासक्रमच ठरवलेला नाही. त्यासाठी समिती स्थापन केल्याचेही ऐकिवात आले, पण पुढे काही कामच झाले नाही. गेली अनेक वर्षे विशेष मुलांसाठी करीत असलेल्या कामाच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही 'चेतना ’मधील मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. तो अन्य शाळांसाठीही उपयुक्त ठरू शकेल.
-पवन खेबुडकर,
(कार्याध्यक्ष, चेतना विकास मंदिर )

Web Title: Not a curriculum for children with intellectual disabilities ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.