तो मृतदेह अजीजचा तर नसेल ना? खात्री डीएनए चाचणीनंतरच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:48 AM2018-03-28T00:48:23+5:302018-03-28T00:48:23+5:30
मोहन सातपुते ।
उचगाव : ‘ती सायंकाळची वेळ आमच्यासाठी काळच बनून आली.४ नोव्हेंबर २०१७ ला अजीज सैफुउद्दीन वजीर (वय ४५, रा. तामगाव) गोकुळ शिरगाव, एमआयडीसी येथील राहत्या घरातून काम बघून येतो, असे सांगून गेले. ते गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत.’ बेपत्ता अजीजविषयी ब ोलताना पत्नी फातिमा डोळ्यांत पाणी आणून सांगू लागली.
अजीजच्या वडिलांचा गोकुळ शिरगाव येथे एस. व्ही. इंजिनिअरिंग हा कारखाना आहे. अजीजला वडील नाहीत. आई ७० वर्षांची आहे, तर दोन भावांपैकी एका भावाचे निधन झाले आहे, तर तिसरा भाऊ फॅब्रिकेशनची कामे करतो आणि बहीणही आईचा सांभाळ करीत येथेच राहते. पत्नी फातिमा अजीज वजीर (वय ३६) दोन मुलांसह येथील खासगी कारखान्याच्या पडक्या खोलीत राहत आहे. थोरला मुलगा समध (वय १६) इयत्ता ९ वीमध्ये काडसिद्धेश्वर हायस्कूल येथे शिक्षण घेतो, तर लहान मुलगा मेहबूब (वय ८) विद्यामंदिर तामगाव येथे दुसरीत शिकत आहे.
काही वर्षांपूर्वी अजीजने आपला साडेचार गुंठे प्लॉट व एक गुंठा जमीन तामगाव व नेर्ली येथील एका खासगी मालकाला गहाणवट दिली होती. जसजसे त्याचे पैसे घेतले तसे पैसे परत देतानाही व्याजासह रकमेची मागणी खासगी मालकाने केली होती. तर मध्यस्थी व्यक्तीनेही परस्पर पैसे घेऊन अजीजला फसविले होते. मिरज येथे त्याच्या वडिलांची शेती आहे. त्या संपत्तीची वाटणी करण्याचेही जवळजवळ निश्चित झाले होते. कधीतरी त्यावरून घरी वादविवाद व्हायचे, पण इतक्या टोकाचे नव्हते.
नुकताच तामगाव येथील खणीत हातपाय तारेने बांधलेल्या अवस्थेत एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह गोकुळ शिरगाव पोलिसांना सापडला. त्यानंतर तामगाव परिसरातून कोण व्यक्ती बेपत्ता आहे का? अशी सर्वत्र चर्चा झाली. आपला पती अजीज हा बेपत्ता असल्याने सीपीआर हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी गेले. संबंधित मृताने घातलेल्या कपड्यांची ओळख करताना त्या व्यक्तीच्या खिशात ताईत ठेवण्यासाठी पोपटी रंगाच्या कपड्याचा खिसा आढळला. अजीजच्या अंगातही अगदी सेम अशीच पँट होती. यावरून त्याची कपड्यांबाबतची ओळख झाली आहे; पण मृतदेह नक्की त्याचाच असल्याची खात्री डीएनए चाचणीनंतरच होईल.
कर्ता पुरुष घरातून बेपत्ता झाल्याने आमच्यावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या बेपत्ता होण्याने संसाराची घडी विस्कटली आहे. कोणी आधार देणारा जवळ नसल्याने भयभीत होऊन कसेतरी दिवस आम्ही ढकलत आहोत. ते कुठं असतील की त्यांचा कोणी घातपात घडवून आणला असेल, याची काळजी लागून राहिली आहे, असेही फातिमा यांनी सांगितले.
या जमिनीच्या व ्यवहारानेच घातझाला नाही ना ?
अजीज वजीर यांची वडिलोपार्जित साडेचार गुंठे जमीन तामगावला खणीजवळ होती. तर कारखाना परिसरातही जागा होती.
या जागा रीतसर खरेदी दिलेल्या नव्हत्या, तर व्याजाने गहाणवट दिल्या होत्या.
पैसे आले की सोडवायच्या होत्या, पण ह्या जमिनीपायीच त्यांचा घात झाल्याचा संशय अजीजच्या पत्नी फातिमा यांना आहे.
तामगाव (ता. करवीर) येथील अजीज वजीर यांची हीच ती छोटी खोली. तिथं आता बेपत्ता अजीजच्या जाण्याने पत्नी-मुलाचा जीव कासावीस झाला आहे. आपल्या दोन मुलांसह फातिमा वजीर.