हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:48 PM2020-10-27T17:48:00+5:302020-10-27T18:07:54+5:30
BJP , Uddhav Thackeray, Maratha Reservation, chandrakant patil, kolhapurnews हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.याचा त्यांनी यावेळी निषेधही केला.
कोल्हापूर : हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मराठा आरक्षणापासून महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार पहिल्या दिवसापासून पळ काढत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होती. त्यामध्ये पुढची तारीख पडल्यानंतर कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेधही केला.
दसऱ्यादिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, हे त्यांचे दसऱ्याचे भाषण नव्हते तर ते शिमग्याचे भाषण होते. सत्तेवर आल्यानंतर काही कामच केले नाही तर ते सांगणार काय ? त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा सन्मान ठेवला नाही. त्यामुळे मग शेण, गोमूत्र, काळ्या टोपीखालील डोके यावर ते बोलले. मात्र शेतकरी, महापूर, अतिवृष्टी, कर्जमाफी याबाबत ते काहीही बोलले नाहीत.
पाटील म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाबाबतचा प्रकार पाहिल्यानंतर हे सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणापासून पळ काढत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज दोन नंबरला केस होती. ती पुकारली तेव्हा त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
न्यायाधीशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली; परंतु प्रश्नाचे महत्त्व ओळखून त्यांनी नंतर पुन्हा सुनावणी घेतली. यावेळी शासनाने चार आठवड्यांची मुदत मागितली आणि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही याचिका चालावी, अशी इच्छा प्रदर्शित केली. मात्र, यासाठीची जी पूर्वतयारी करणे गरजेची होती ती अजिबात नव्हती.
संबंधित मंत्री, ॲडव्होकेट जनरल, त्यांना इनपूट देणारे आणखी काही तज्ज्ञ वकील, या क्षेत्रांतील जाणकार यातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आता चार आठवडे पुन्हा सारे शांत होणार आहे. आता जो युक्तिवाद होईल तो पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रवेश, विविध परीक्षा, नोकरी भरती सर्व काही ठप्प होणार आहे. आम्ही एवढी ताकद लावली होती की १ वर्ष सर्वोच्च न्यायालयातील केस चालवली असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.