थेंबाचाही शिंताेडा नाही, इतके संपतरावांचे निर्मळ जीवन : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:12 PM2023-01-29T15:12:52+5:302023-01-29T15:13:18+5:30

‘शेकाप‘चे माजी आमदार संपतराव पवार यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांच्या चारित्र्यावर एका थेंबाचाही शिंतोडा उडाला नाही.

Not even a drop is wasted, so much pure life of Sampatrao: Sharad Pawar | थेंबाचाही शिंताेडा नाही, इतके संपतरावांचे निर्मळ जीवन : शरद पवार

थेंबाचाही शिंताेडा नाही, इतके संपतरावांचे निर्मळ जीवन : शरद पवार

googlenewsNext

कोल्हापूर : ‘शेकाप‘चे माजी आमदार संपतराव पवार यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात त्यांच्या चारित्र्यावर एका थेंबाचाही शिंतोडा उडाला नाही. इतके निर्मळ जीवन त्यांनी जगल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. ‘भोगावती’ खत कारखान्यांचे संपतरावांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

संपतराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी समारंभानिमित्त शनिवारी छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण सडोली खालसा (ता. करवीर) येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘शेकाप’चे सरचिटणीस आमदार जयंत पाटील होते. पवार यांची ग्रंथतुला करत त्यांचा सपत्नीक सत्कार केला. ‘संघर्ष यात्री’ व ‘लाल सलाम‘ गौरवग्रंथाचे प्रकाशनही शरद पवार यांच्या हस्ते झाले.

शरद पवार म्हणाले, दिवंगत नेते एन. डी. पाटील यांच्या सोबत कोल्हापूर जिल्ह्यात गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई करण्यात संपतराव पवार अग्रभागी राहिले. हद्दवाढ, शेती पंपाचा वीज दर, पाणीपट्टी, शिक्षण क्षेत्रातील नवीन नीतीला आवर घालण्यासाठी ‘शेकाप’ने नेतृत्व करत लढे उभे केले आणि यशस्वी केले. या नेतृत्वाच्या मालिकेत संपतराव यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘सांगरुळ’च्या सामान्य माणसाने त्यांना दहा वर्षे विधीमंडळात काम करण्याची संधी दिली, त्याचे सोने करत सातत्याने कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळाबरोबरच रस्त्यावर लढत राहिले. समाजातील शेवटच्या माणसाबद्दल आजही त्यांच्या मनात तळमळ व अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी सामूहिकपणे काम करणे गरजेचे आहे. खत कारखान्यांची माहीती घेऊन त्याला गती देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील म्हणाले, आयुष्यभर तळागाळातील सामान्य माणसाला उभं करण्याचा विचार उराशी बाळगून तरुणांसमोर लढण्याचा नवा आदर्श संपतराव पवार यांनी ठेवला. त्यामुळेच पक्षाच्या मध्यवर्ती समितीमध्ये त्यांच्या शब्दाला खूप वजन आहे. हीच त्यांच्या आयुष्याची शिदोरी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राजकारणात संपतराव पवार यांचा सारखा सरळ माणूस मी पाहिला नाही. आज आठ-दहा वर्षांत चार पक्ष बदलले जातात, मात्र त्यांनी डावा विचार कधी सोडला नाही. ‘शेकाप’च्या या निष्ठावंत नेत्याला सलाम करतो. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणारी माणसं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला संपतरावांसारखा संघर्षमय नेतृत्व उभा असल्याचा अभिमान वाटतो.

सत्कारमूर्ती संपतराव पवार म्हणाले, एकीकडे अमृतमहोत्सव साजरा होतो याचा आनंद जरी असला तरी अजून भांगलण करणाऱ्या माताभगिनींचे आयुष्य बदललेले नसल्याची खंत मनात आहे. हा कष्टकरी माणूस नजरेसमोर ठेवून उद्याचे राजकारण केले पाहिजे, हे करण्याची ताकद पवारसाहेब आपल्यात आहे, म्हणूनच माझ्या अमृतमहोत्सव तुमच्या हस्ते व्हावा, यासाठी आग्रह होता. माझ्या आयुष्यात एक काम अपूर्ण राहिले, सांगरुळ मतदारसंघातील गोरगरीब जनतेने मला पाचशे, हजार रुपये देऊन भोगावती खत कारखाना उभा केला, मात्र त्यातील माझं ज्ञान अपूर्ण होते. नको त्या गोष्टीत पडलो. शासनाने मदत केली नाही, बँकांनी सहकार्य केले नाही. तण, मन, धन देऊन ज्यांनी मला आयुष्यभर साथ दिली त्यांचे स्वप्न वाशीच्या माळावर अपूर्ण अस्वस्थेत उभे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पाठबळ दिले तर अमृतमहोत्सवी सत्काराचा आनंद अधिक होईल.

गौरव समितीचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, प्रा. शिवाजीराव भुकेले, राजन साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब देवकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार राजेश पाटील, प्रा. जयंत आसगावकर, प्रकाश आबीटकर, अरुण लाड, कर्नल भगतसिंह देशमुख, वैभव नायकवडी, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संजय घाटगे, सत्यजित पाटील-सरुडकर, अशोकराव पवार, क्रांतिसिंह पवार यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ पाटील यांनी आभार मानले.

धनगरवाड्यावरील जानू जानकरकडून दिशा मिळाली

दहा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम केले. धनगरवाड्यातील जानू जानकर भेटला की म्हणायचा, ‘बापू मत दिलं; पण काम झालं नायं गड्या’. त्याची तळमळ मला दिशा देत होती, असे संपतराव पवार यांनी सांगितले.

अन...‘सी. बी.’नी नैवेद्य शिवला

एका कारखान्याचा उपाध्यक्ष या पलीकडे माझी काहीच ओळख नव्हती, मात्र सोबत जीवाभावाची माणसं होती, जी माझ्यापेक्षाही मोठी होती, मात्र त्यांनी मला मोठं केले. त्यातीलच सी. बी. पाटील होते, रक्षाविसर्जन वेळी आम्ही सगळ्यांनी पायी पडल्यानंतरच नैवेद्य शिवला, इतकी जीवाभावाची माणसं होती, असे सांगतात संपतराव पवार भावनिक झाले.

विठ्ठलमात्रा आणि पथ्ये

दिवंगत नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना संपतराव पवार म्हणाले, ‘एन. डी’. सर नेहमी सांगायचे, ज्यांनी विठ्ठलमात्रा घेतली त्यांनी आयुष्यभर पथ्ये सांभाळली पाहिजेत. हा विचार घेऊन आयुष्यभर काम केले.

‘गीतांजली’, ‘ऐश्वर्यां’ना अश्रू अनावर

‘सांगरुळ’च्या जनतेने दिलेले प्रेम, खत कारखान्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सांगत असताना संपतराव पवार हे भावुक झाले. हे पाहून त्यांच्या कन्या गीतांजली व ऐश्वर्यांना अश्रू अनावर झाले, हे पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

‘पी. एन.’ यांच्या अनुपस्थितीची चर्चा

कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. ते राजकीय वैर विसरून येतील, अशी पवार यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, ते आलेच नाहीत. त्याचबरोबर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातीलही कोणीही नव्हते, याची चर्चा सुरू होती.

कार्यकर्त्यांनी समारंभ डोळ्यात साठवला

संपतराव पवार यांनी डोंगरमाथा, वाड्या-वस्त्यावरील सामान्य माणसासाठी काम केले. तो माणूस आपल्या नेत्याचा अमृतमहोत्सवासाठी आवर्जून उपस्थित होता. संपतराव पवार हे जुन्या आठवणी सांगत असताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

नेटके नियोजन, ओसांडून वाहणारी गर्दी

मोकळ्या पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला करवीर, राधानगरी तालुक्यांतील हजारो कार्यकर्ते आले होते. विशेष म्हणजे जे पवार यांना सोडून गेले, तेही शुभेच्छा देण्यासाठी हजर राहिल्याने सडोली खालसाचे मैदान गर्दीने ओसांडून वाहत होते. गौरव समितीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

Web Title: Not even a drop is wasted, so much pure life of Sampatrao: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.