Kolhapur: इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, ए. वाय. पाटील यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 01:30 PM2023-09-30T13:30:40+5:302023-09-30T13:31:53+5:30
..तर भावी पिढी माफ करणार नाही
तुरंबे : राधानगरी धरणांचा तालुका आहे. या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे तालुका सरपंच परिषद आणि काळम्मावाडी बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, शिवाजीराव खोराटे यांनी पहिली पाणी परिषद सरवडेत घेतली.,स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्यासह तत्कालीन नेत्यांनी व्यापक आंदोलन केल्याने धरण झाले. धरणासाठी विस्थापित झालेल्या नऊ गावांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणाची गळती, गार्डनची दुरवस्था, विश्रामगृह दुरवस्था, नियंत्रणासाठी धरणस्थळी अधिकारी नाहीत आणि कार्यालय नाही यांचाही विचार करावे लागेल.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, दूधगंगा धरणाच्या पाण्याचे लेखापरीक्षण करावे लागेल. ज्याचा हक्क आहे त्यालाच पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी दुसऱ्या कोणत्याही संस्थेला ज्यांचा या धरणाच्या लाभ क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांना का द्यायचे? असा सवाल केला. तीव्र लढा उभारून शासनाशी संघर्ष करू. एकवेळ सरकारच्या विरोधात लढाई उभारू पण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, आंदोलन करावे लागले तरी हरकत नाही. शेती आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हे येथील मूळ शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने मदत करू. सुळकुड योजनेचा घाट थांबवा नाही तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
यावेळी सत्यजित जाधव, भूषण पाटील, नामदेव चौगले, शहाजी पाटील, बापू किल्लेदार, प्रकाश पोवार, संभाजी देसाई, सिकंदर मुल्लाणी, सागर कोंडेकर, यांनी मनोगते मांडली. यावेळी अध्यक्ष नेताजी पाटील, बिद्री संचालक युवराज वारके, प्रभाकर पाटील, एकनाथ पाटील, नाना पाटील, अरुण जाधव, फिरोजखान पाटील, लहुजी जरग, नानासो पाटील, युवराज वारके, हिंदुराव चौगले, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, रंगराव किल्लेदार उपस्थित होते.
...तर भावी पिढी माफ करणार नाही
आमच्या आजोबा, पणजोबा यांनी दूधगंगा धरण उभारण्यासाठी संघर्ष केला. या धरणाचे पाणी कर्नाटक, कोल्हापूरला जाते. आता निसर्ग लहरी आहे. पाऊस झालेला नाही. जर हे पाणी सगळे पळवून नेणार असतील, आणि आपण ते थांबवू शकलो नाही तर भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे मत सागर कोंडेकर व प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.