सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:27 PM2022-07-08T13:27:08+5:302022-07-08T13:27:44+5:30
छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा भाजपशी आघाडी करून लढविणार आहे. त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चंद्रकांत पाटील व माझ्यात काही व्यावसायिक वाद नव्हता. ते एक मोठे नेते आहेत. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी २०२४ ची विधानसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे जो निर्णय घेतील तो प्रमाण मानून पुढील दिशा ठरवू, असे क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले, छत्तीस वर्षे शिवसेनेत निष्ठापूर्वक काम केल्यानंतर आणि ‘मातोश्री’ला दैवत मानल्यानंतरसुद्धा मुख्यमंत्री शिंदे गटात सामील होण्यात वैयक्तिक स्वार्थ नाही.
राज्यात बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची सत्ता येतेय आणि शिंदे यांच्याकडे विकासाची दृष्टी असल्यामुळे आपण त्यांच्या गटात गेलो. माझ्या कामाचे फळ म्हणून पक्षाने आमदार केले. मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला. या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी विशिष्ट प्रसंगांत एकनाथ शिंदे नेते म्हणून पाठीशी राहिले.
आत्मपरीक्षण करण्याची वेळ..
शिवसेना पक्षप्रमुख, ठाकरे कुटुंब, मातोश्री, तसेच शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यावर टीका करण्याचे क्षीरसागर यांनी टाळले. शिवसेनेत यापूर्वीदेखील आमदार फुटले. शिवसेना संपली नाही. परंतु, आताएवढे ४० आमदार फुटले नव्हते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन कार्यकारिणी निवडणार
शिवसेना शिंदे गटाची बांधणी करण्यात येणार असून, शहराची नवीन कार्यकारिणी लवकरच निवडली जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. एकमेकांबद्दल कटुता न येता बाळासाहेब सेनेचे पदाधिकारी नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोठी संधी मिळणार
मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मला मोठी जबाबदारी देतील अशी अपेक्षा आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील, असे क्षीरसागर म्हणाले. तुम्हाला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे का? अशी विचारणा करता सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, असे सांगून त्यांनी थेट बोलणे टाळले.