मदार निवासींवरच, पण रुबाब वरिष्ठ डॉक्टरांचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:50 AM2019-07-25T00:50:57+5:302019-07-25T00:51:17+5:30
अपुरी यंत्रसामग्री आणि अल्प निधीमुळे सीपीआर व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार करताना मर्यादा पडत असल्या, तरी रुग्णालयातील उपचारांची खरी मदार ही निवासी वैद्यकीय
तानाजी पोवार ।
कोल्हापूर : अपुरी यंत्रसामग्री आणि अल्प निधीमुळे सीपीआर व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार करताना मर्यादा पडत असल्या, तरी रुग्णालयातील उपचारांची खरी मदार ही निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच अवलंबून आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच बहुतांशी उपचार केले जातात अन् रुबाब मात्र नेहमीच काहीवेळापुरते येणाºया वरिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांचा राहिला आहे.
दिवसभरात हजारो रुग्णांची उपचारासाठी सीपीआरमध्ये ये-जो असते. येथे रुग्णांच्या नातेवाइकांना थेट निवासी डॉक्टरांनाच तोंड द्यावे लागते. मेडिसीन विभागात, आर्थो विभागात रुग्णांची नेहमीच वर्दळ असते; तर सर्पदंश झालेल्या सुमारे ३० ते ४० टक्के रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागते. अशावेळी निवासी वैद्यकीय अधिकाºयांची भूमिका महत्त्वाची मानली जाते; कारण यावेळी वैद्यकीय अधिकारी जाग्यावर उपलब्ध होत नाहीत.
‘सीपीआर’मध्ये दाखल रुग्णांच्या रक्ताच्या तपासण्या करणे अत्यावश्यकच असतात. त्या तपासण्या ‘सीपीआर’च्या लॅबमध्ये होत नाहीत. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी मोठमोठे विचार मांडताना रुग्णालयात सर्वच रक्ताच्या तपासण्या येथे केल्या जातात, असे सांगतात; पण ज्या रक्ताच्या तपासण्या येथे होत नाहीत, त्या बाहेरून करण्यास भाग पाडले, तर याच निवासी वैद्यकीय अधिकाºयांना वरिष्ठ अधिकाºयांचे खडे बोल खावे लागतात; पण या तपासण्या करण्याशिवाय गत्यंतरही नसते.
थायरॉईड, इलेक्ट्रोलाईटस्, युरिक अॅसिड, ट्रॉप्टी, कॅल्सियम, फॉस्फरस, अल्कलाईन फॉस्फेट, एचडीएल, एलडीएल, सीपके-एमबी, एबीजी, मायग्लोबीन या रक्ताच्या तपासण्या ‘सीपीआर’मध्ये होत नाहीत.
वरिष्ठ आहेत, पण विभाग रिकामाच
‘सीपीआर’मध्ये प्रत्येक वरिष्ठ विभागात एक विभागप्रमुख, एक असिस्टंट, एक लेक्चरर अशी वरिष्ठ पदे आहेत; पण हे तीनही वरिष्ठ अधिकारी एकमेकांवर कामे सोपवितात, प्रत्यक्षात या तिन्हीही विभागाचे कोणीही जाग्यावर दिसत नाहीत.
हल्ला हा निवासी डॉक्टरांवरच!
प्रत्येक विभागात वरिष्ठ अधिकारी कधी थांबतच नसल्याने जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकाºयांवर येते; त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांच्या प्रत्येक रोषाला हे निवासी डॉक्टरच सामोरे जातात; त्यामुळे हल्लाही यांच्यावरच होता. सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांची हजेरी लागते.
देखावाच
सर्जरी विभाग आणि मेडिसीन विभागाचे प्रमुख हे अनेकवेळा उपस्थित असतात; पण ते फक्तदेखाव्यासाठीच. ते बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना कधीही तपासत नाहीत. त्यांनी शस्त्रक्रिया केली तर ती क्वचितच एखाद्या रुग्णाची, अशी स्थिती असताना त्यावर वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
‘सीपीआर’मधील पदांची संख्या
संवर्ग मंजूर भरलेली पदे
वर्ग १ ३३ २
वर्ग २ ४४ ४०
लिपिक २८ २६
तांत्रिक ८४ ६२
नर्सिंग ५६२ ५३०
वर्ग ४ ३१८ १८९
बाह्यरुग्ण नोंदणी : रोज किमान १२००
वैद्यकीय अधिकारी संख्या : ४८
निवासी वैद्यकीयअधिकारी : ९१
कॉटची संख्या : ६५०
रोज दाखल रुग्ण : १६० ते १९०