‘दिलबहार’च्या सामन्यात ‘पंचगिरी’ नाही -कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:26 AM2019-03-27T01:26:37+5:302019-03-27T01:27:23+5:30
पंचांच्या निर्णयामुळे जर दिलबहार तालीम मंडळ संघाचा पराभव व हुल्लडबाजी होत असेल, तर या संघाच्या यापुढील कोणत्याही सामन्यांत ‘पंचगिरी’ न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सॉकर रेफ्री असोसिएशनने
कोल्हापूर : पंचांच्या निर्णयामुळे जर दिलबहार तालीम मंडळ संघाचा पराभव व हुल्लडबाजी होत असेल, तर या संघाच्या यापुढील कोणत्याही सामन्यांत ‘पंचगिरी’ न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सॉकर रेफ्री असोसिएशनने घेतला. याबाबत छत्रपती शाहू स्टेडियमवरील के.एस.ए.च्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय एकमुखी घेण्यात आला.
दिलबहार-पाटाकडील तालीम यांच्यात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी (दि. २४) झालेल्या अंतिम सामन्यानंतर पंच रूममध्ये येऊन दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींनी रूमच्या दरवाजावर लाथा मारल्या. यासह सहपंच अजिंक्य गुजर यांना शिवीगाळ करीत भिंतीवरील आरसा घेऊन त्यांना डोक्यात मारहाण केली. इतर पंचांनी हल्लेखोरांना रोखून धरल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
ही घटना फुटबॉलला काळिमा फासणारी आहे. आम्ही सर्व पंच या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. यातील नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. याबाबत एका दैनिकात ‘दिलबहार’च्या जबाबदार नेत्याने रेफ्रींच्या निर्णयामुळे संघावर पराभवाची नामुष्की आली, असे वक्तव्य केले आहे. जर या संघाला रेफ्रींच्या निर्णयामुळे पराभव व हुल्लडबाजी होते, असे वाटत असेल तर यापुढे ‘दिलबहार’च्या कोणत्याही सामन्यात पंच म्हणून आमचे पंच उपलब्ध होणार नाहीत, असा निर्णयही सर्वांनुमते घेण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सचिव प्रदीप साळोखे, सहसचिव राजेंद्र राऊत, सूर्यदीप माने, अभिजित गायकवाड, सुनील पोवार, सोमनाथ वाघमारे, राहुल तिवले, गौरव माने, श्रेयस मोरे, गजानन मनगुतकर, योगेश हिरेमठ, शहाजी शिंदे, अजिंक्य गुजर, सतीश शिंदे, हर्षल राऊत, आदी उपस्थित होते. पोलिसांनी १६ कॅमेऱ्यांतील फुटेज ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई सुरू केली आहे; तर ‘के. एस. ए.’कडूनही चंद्रकांत चषक स्पर्धेच्या संयोजकांनी स्पर्धेसाठी केलेली मैदानाच्या मागणीचा अर्ज, त्यात सहभागी होणाऱ्या संघांची नावे व त्यातील खेळाडू, पंच, सुरक्षारक्षक, संयोजन समितीची माहिती, अंतिम सामन्यातील दोन्ही संघांतील राखीव खेळाडू, आदी माहिती मागविली.
दिलबहार ‘ब’ संघाचा नोंदणीकृत खेळाडू शशांक माने याच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींनी रूमच्या दरवाजावर लाथा मारल्या. यासह सहपंच अजिंक्य गुजर यांना शिवीगाळ करीत आरसा घेऊन डोक्यात मारहाण केली.
शाहू स्टेडियमवरील के. एस. ए. कार्यालयात मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनच्या बैठकीत सचिव प्रदीप साळोखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, राजू राऊत उपस्थित होते.